विशेष लेख :- न्याय आपल्या दारी: मोफत कायदेशीर मदतीची संकल्पना आणि महत्त्व

विशेष लेख *न्याय आपल्या दारी: मोफत कायदेशीर मदतीची संकल्पना आणि महत्त्व* भारतीय लोकशाहीमध्ये कायद्याचे शासन या सिद्धांताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याचा मूलभूत आशय असा की राज्यातील सर्व व्यक्ती, संस्था आणि शासनसत्ता ही कायद्याला आधीन असते आणि कोणालाही कायद्यापेक्षा वरचे स्थान नसते. यासाठी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत समानता म्हणजेच कायद्यापुढीलच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक पातळीवर ही सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होय. याचसोबत न्याय सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हे तत्व ही लोकशाही व्यवस्थेचा मूलधार मानला गेला आहे राज्यघटनेच्या संदर्भात कायद्याची शासन समानता आणि न्यायप्रवेशनाचा हक्क हे तिन्ही परस्पर पूरक आणि अविभाज्य तत्वे मानले जातात परंतु केवळ कायद्याचे राज्य घोषित करणे पुरेसे नसून या कायद्याखाली सर्व नागरिकांना समसमान वागणूक मिळणे अत्यावश्यक आहे. जर कायद्या पुढील समानता प्रत्यक्ष व्यवहारात साध्य करायचे असेल तर प्रत्येक नागरिकाला न्यायप्रवेशनाची सुलभ उपलब्धता असणे अनिवार्य ठरते कारण न्यायप्रणालीपर्यंत पोहोचण्याची आर्थिक सामाजिक आणि संरचनात्मक अडचण राहिली तर समानता केवळ कागदावरील घोषणेतच अडकून राहते. न्याय हा सर्वांना सहज व रास्त उपलब्ध झाला पाहिजे समाजातील सर्व स्तराच्या लोकांना आपापली हक्क ही न्यायप्रणालीमार्फत बजावता आली पाहिजे म्हणून संविधानातील कलम ३९ अ राज्याला असे निर्देश देतो की आर्थिक दुर्बलतेमुळे किंवा सामाजिक असमानतेमुळे कोणत्याही नागरिकास न्यायप्रवेश नाकारला जाऊ नये. या उद्दिष्टाच्या अंमलबजावणीसाठी विधी सेवा प्राधिकरण अधिनियम १९८७ हा कायदा लागू करण्यात आलेला आहे द लीगल सर्विसे अथॉरिटीज अॅक्ट १९८७ या कायद्याने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, प्रत्येक राज्यासाठी राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्ह्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या विधी सेवा पुरविण्यासाठी प्रस्थापित केले आहेत कायद्याच्या जागृती मधून लोकांच्या बळकटीकरणाकडे वाटचाल करण्यासाठी शासनाने राष्ट्रीय स्तरापासून तालुकास्तरापर्यंत अशी एक सुसज्ज आणि भव्य अशी यंत्रणा उभी केली आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (District Legal Services Authority DLSA) ही संस्था भारतीय न्यायव्यवस्थेतील तळागाळातील लोकन्यायाची वाहक म्हणून ओळखली जाते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हा केवळ प्रशासकीय घटक नसून, संविधानिक मूल्यांची अंमलबजावणी करणारा सामाजिक परिवर्तनाचा साधक आहे. विधी सेवा प्राधिकरण व्यवस्था ही भारतीय न्यायव्यवस्थेतील केवळ प्रशासकीय रचना नसून "न्याय सर्वांसाठी" या संविधानिक ध्येयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी प्रभावी यंत्रणा आहे. न्यायप्रवेशातील आर्थिक आणि सामाजिक अडथळे दूर करून समतेवर आधारित न्यायव्यवस्था घडविण्यात या संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. या कायद्याचा मुख्य हेतू हा समाजाच्या अक्षम घटना घटकातील लोकांना मोफत आणि सक्षम कायदेशीर सेवा पुरवणे हा आहे जेणेकरून आर्थिक व इतर कारणांमुळे ते न्याया पासून वंचित राहणार नाहीत. इतर नागरिकांना विधी सेवा या सहज उपलब्ध करून घेता येतात पण समाजातील गरीब दुर्बल व निरक्षर लोकांना होणारा खर्च, लागणारा वेळ, प्रक्रिया व अन्य अडचणीमुळे न्यायालयापर्यंत पोहोचता येत नाही. हीच दरी मीटविण्यासाठी या प्राधिकरणांची आवश्यकता आहे. न्याय हा मोफत व सहज उपलब्ध करून देता आले तरच सर्वांना समान न्याय हे तत्व पाळता येईल. फक्त न्यायप्रणालीच नाही तर आपल्या कल्याणकारी राज्यामध्ये दुर्बल घटकांच्या सक्षमीकरण व मुख्य प्रवाहामध्ये समाविष्ट करण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना व विशेष कार्यक्रम राबवले जातात मात्र निरक्षरतेमुळे या योजनांची माहिती अनेक जणांना नसते त्यामुळे अनेक लोक त्यांच्या हक्क व अधिकारांपासून वंचित राहतात. याच्या प्रयोजनासाठी या कायद्याच्या कलम (४) मध्ये प्राधिकरणांची विविध उद्दिष्टे नमूद केलेली आहेत त्यामध्येच कायदेशीर साक्षरता पुरवणे लोकांना कायदेशीर जागरूक करून शिक्षित करणे त्यांचे हक्क फायदे व शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना मार्फत आलेल्या विशेष अधिकारांबद्दल त्यांना सजग करणे हा आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी स्थानिक पातळीवर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. (१) अर्ज स्वीकारणे आणि पात्रता पडताळणी: नागरिक न्यायसहाय्यासाठी अर्ज सादर केल्यानंतर, जिल्हा प्राधिकरण त्यांची पात्रता कायद्यानुसार तपासते. उदा. उत्पन्न मर्यादा, सामाजिक वर्गलिंग, वय, अपंगत्व, सामाजिक परिस्थिती हे निकष ठराविक आणि पारदर्शक असतात. (२) वकील नियुक्ती व मार्गदर्शनः पात्र नागरिकांसाठी अनुभवी वकीलांची नियुक्ती केली जाते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वकील पॅनेल तयार करून त्याचे नियमित पुनरावलोकनही करते. नियुक्त वकील केवळ न्यायालयीन प्रतिनिधित्वच करत नाहीत, तर प्रकरणाशी संबंधित कायदेशीर प्रक्रिया, अधिकार आणि उपलव्ध पर्यायांविषयी अर्जदारास सतत मार्गदर्शन आणि सल्ला देतात. यामुळे न्यायप्रवेशन अधिक कार्यक्षम व नागरिकाभिमुख होते. (३) लोकन्यायालयांचे आयोजनः जिल्ह्यातील विविध न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणे लोकन्यायालयांत हलवून तडजोडीने निपटवली जातात. यामुळे वेळ, खर्च आणि मानसिक ताण या तिन्ही बाबींमध्ये मोठ्या प्रमाणात बचत होते. लोकन्यायालयांमुळे समाधानकारक आणि टिकाऊ तोडगे निर्माण होण्याची शक्यता अधिक असल्याने ही यंत्रणा सामाजिक न्यायाची प्रभावी साधनरूप ठरते (४)कारागृह व संस्थांमधील कायदेशीर मदत : तुरुंगातील कैदी, महिला आश्रयगृहे, बालसुधारगृहे येथे जाऊन प्रत्यक्ष भेटी घेतल्या जातात. समितीचे प्रतिनिधी या संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन समस्यांची माहिती घेतात, प्रकरणांची स्थिती समजून घेतात आणि आवश्यक त्या कायदेशीर उपाययोजना सुचवितात. ही सेवा विशेषतः महत्त्वाची आहे कारण अशा अनेक व्यक्तींना न्यायालयापर्यंत स्वतंत्रपणे पोहोचणे शक्य नसते. (५) जागरूकता मोहिमा: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ग्रामीण व शहरी भागात कायदे शिबिरे, पंचायत स्तरावरील बैठक, शालेय कार्यक्रम, आयोजित करते या मोहिमांद्वारे नागरिकांना त्यांच्या मूलभूत अधिकारांची, कायदेशीर उपाययोजनांची आणि मोफत कायदेशीर मदतीच्या तरतुदींची माहिती दिली जाते कलम 12 अंतर्गत खालील व्यक्तींना मोफत कायदेशीर सेवा मिळण्याचा अधिकार आहे: (अ) अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीतील सदस्य (ब) मानव तस्करीचे किंवा भिकारीपणाचे बळी (संविधानातील कलम 23 नुसार) (क) महिला किंवा मुले (ड) दिव्यांग व्यक्ती (दिव्यांग व्यक्ती अधिनियम, 1995 नुसार) (ई) अन्यायकारक परिस्थितीत असलेले लोक, जसे कीः सामूहिक आपत्तीचे बळी जातीय हिंसाचाराचे बळी जातीय अत्याचाराचे बळी पूर, दुष्काळ, भूकंप किंवा औद्योगिक आपत्तीचे बळी (फ) संरक्षणगृह, बालगृह, मानसिक रुग्णालय किंवा तुरुंगात असलेले लोक (ग) अल्प उत्पन्न गट सर्वोच्च न्यायालयासाठीः वार्षिक उत्पत्र ₹5,00,000 पेक्षा कमी वा इतर न्यायालयांसाठीः राज्य सरकारने ठरविलेली मर्यादा (राज्यानुसार बदलते) वरील कायद्याअंतर्गत लातूरच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत भव्य अशा कायदेविषयक महाशिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी रूक्मिणी मंगल कार्यालय, लक्ष्मीप्रयाग बैंक्वेट, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल समोर, औसा बार्शी रिंग रोड लातूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजना, कायदे व कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. तसेच विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा प्रशासन लातूर चे विविध विभागा मार्फत संबंधीत लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत विविध विभागांच्या वतीने वेगवेगळे स्टॉल्स उभारण्यात येणार असून, नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या स्टॉल्सवर योजनांबाबत माहिती, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. सदरील महा शिवीरास मा. न्यायमूर्ती श्री. एस.जी. चपळगांवकर न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायमूर्ती न्यायीक जिल्हा लातूर, मा. न्यायमूर्ती श्रीमती वैशाली पाटील-जाधव, न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायमूर्ती न्यायीक जिल्हा लातूर, मा. श्री. एस.जे. भारूका प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश लातूर तथा मा. अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर तसेच मा. श्री. व्ही. एन. गिरवलकर-सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर व इतर मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. -डॉ. शुभांगी व्ही. पांचाळ सहयोगी प्राध्यापक, दयानंद विधी महाविद्यालय, लातूर

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित