महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांचा आढावा अधिसूचित सेवांचा लाभ विहीत कालावधीत द्यावा - राज्य सेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांचा आढावा अधिसूचित सेवांचा लाभ विहीत कालावधीत द्यावा - राज्य सेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव लातूर, दि. १८: राज्य शासनाने नागरिकांना पारदर्शक, गतिमान आणि कालबद्ध सेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू केला असून याअंतर्गत विविध शासकीय विभागांच्या सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. या अधिसूचित सेवांचा लाभ नागरिकांना विहित कालावधीत देण्याची जबाबदारी प्रत्येक पदनिर्देशित अधिकारी यांची आहे. त्यादृष्टीने सर्व संबंधितांनी आवश्यक कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे छत्रपती संभाजीनगर विभागाचे राज्यसेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी आज येथे सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, सामान्य प्रशासनच्या उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांसाठी प्राप्त अर्जांचा विहित कालावधीत निपटारा करण्यास प्राधान्य द्यावे. अर्ज प्रलंबित राहू नयेत, यासाठी संबंधित विभाग प्रमुखांनी नियमितपणे आढावा घेवून पाठपुरावा करावा. प्रथम अपिलीय अधिकारी व द्वितीय अपिलीय अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त पदनिर्देशित अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा वार्षिक अहवाल तयार करून अधिनियमांतर्गत आवश्यक कार्यवाही करावी. तसेच आपल्याकडे प्राप्त अपिलावरही वेळेत निर्णय घेण्याची सूचना आयुक्त डॉ. जाधव यांनी यावेळी दिल्या.नागरिकांना जास्तीत जास्त सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध होण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये संग्राम केंद्र सुरु करण्यात आली आहेत. याठिकाणी उपलब्ध सेवा नागरिकांना मिळत असल्याची खात्री करावी, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांविषयी कार्यवाही, अधिनियमातील विविध कलमांतील तरतुदी, आपले सरकार सेवा केंद्र, अपिलावरील कार्यवाही, अपिलीय अधिकारी यांची कर्तव्ये आदी बाबींविषयी राज्यसेवा हक्क आयुक्त डॉ. जाधव यांनी यांनी मार्गदर्शन केले. तसेच सेवा महिना कालावधीत निकाली काढलेले अर्ज, तसेच या वर्षातील प्राप्त अर्ज व निकाली काढलेले अर्ज, अपिलांवरील कार्यवाही आदी बाबींचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. *****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित