इयत्ता बारावी परीक्षा केंद्रांवरील बैठे पथकांचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना यांनी घेतला आढावा

इयत्ता बारावी परीक्षा केंद्रांवरील बैठे पथकांचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना यांनी घेतला आढावा लातूर जिल्ह्यातील 101 परीक्षा केंद्रांवर आजपासून इयत्ता बारावी परीक्षा सुरू झाली आहे. ही परीक्षा कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात होण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. सर्व परीक्षा केंद्रांवर तीन अधिकारी, कर्मचारी यांचे बैठे पथक तैनात करण्यात आले असून या पथकामार्फत परीक्षा केंद्रांवर निगराणी ठेवण्यात येत आहे. आज पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना यांनी जिल्हा परिषदेत इयत्ता बारावी परीक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष कक्षातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व बैठे पथकांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बैठे पथकांतील सदस्यांकडून परीक्षा केंद्रांवरील उपाययोजनांची माहिती घेतली. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे परीक्षा केंद्र परिसराची पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. बैठे पथकांतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सतर्क राहून काम करावे. कोणत्याही परीक्षा केंद्रांवर व परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेश देवू नये. एखाद्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कार्यवाही केली जाईल. भरारी पथकांच्या माध्यमातूनही विविध परीक्षा केंद्रांवर निगराणी ठेवण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या. परीक्षा केंद्रांवर नियुक्त बैठे पथकातील सदस्यांनी एकाच ठिकाणी न थांबता परीक्षा केंद्रांच्या परिसरात कोणतेही गैरप्रकार होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षातून सातत्याने बैठे पथकांचा आढावा घेण्यात येईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना यांनी सांगितले. सामान्य प्रशासनाच्या उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय मठपती, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यावेळी उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित