लातूरमध्ये 'महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६' अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात
लातूरमध्ये 'महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६' अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात
लातूर, दि. १८ (जिमाका): राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राच्या विकासाला चालना देणे आणि निर्यात वृद्धीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या 'महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६' अंतर्गत लातूर येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून उद्योग मित्र हॉल येथे आयोजित या कार्यशाळेला मैत्री कक्षाच्या अपर जिल्हाधिकारी मनिषा कुंभार, लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी गणेश पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निखिल पाटील, कौशल्य विकास विभागाचे श्री. सुर्यवंशी यावेळी उपस्थित होते.
प्रास्ताविक जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील उद्योजकता आणि निर्यात वाढीसाठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली.
उपजिल्हाधिकारी श्री. पवार यांनी लातूर जिल्ह्यात सोयाबीन उत्पादने, दाळ, साखर इत्यादी कृषीजन्य उत्पादनांची निर्यात होत असल्याचे सांगितले. तसेच उद्योग घटकांकडून प्रक्रिया केलेल्या मूल्यवर्धित उत्पादनांची निर्यात वाढवणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन केले.
मैत्री कक्ष कक्षाच्या अपर जिल्हाधिकारी श्रीमती कुंभार यांनी मैत्री पोर्टलवर एकूण १४५ सेवा आणि १७ विविध विभागांच्या सेवा व परवानग्या उपलब्ध असल्याची माहिती दिली. उद्योजकांनी या पोर्टलचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कौशल्य विकास विभागाचे श्री. सुर्यवंशी यांनी लातूर जिल्ह्यातील उद्योगांसाठी पूरक कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे काम उद्योजकांच्या सहकार्याने सुरू असल्याचे सांगितले. निर्यात सल्लागार श्री. सुरज ढगे यांनी ऑनलाइन निर्यात परवाने, निर्यात धोरण २०२३ आणि संबंधित प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली.
बँक ऑफ इंडियाचे श्री. पवार आणि जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. आठवले यांनी बँकांच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच टपाल कार्यालयाचे श्री. सोनटक्के आणि इंडिया इन्शुरन्सचे श्री. राठोड यांनी आयात-निर्यात कार्यपद्धती सोप्या भाषेत समजावून सांगितली. जास्तीत जास्त परकीय चलन मिळवण्यासाठी निर्यातीकडे वळण्याचे आवाहन त्यांनी केले.
**
Comments
Post a Comment