‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६’ अंतर्गत लातूरमध्ये एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६’ अंतर्गत लातूरमध्ये एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन लातूर, दि. १३ : राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि निर्यात वृद्धीस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६’ अंतर्गत लातूर जिल्ह्यात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत उद्योग मित्र हॉल, दै.एकमत भवनच्या पाठीमागे, एम.आय.डी.सी., लातूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यशाळेत एमएसएमई उद्योजक, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, शेतकरी सहकारी संस्था, प्रक्रिया उद्योग केंद्रे, बँक प्रतिनिधी, संशोधक तसेच जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य यांना विशेष आमंत्रित करण्यात आले आहे. कार्यशाळेत पुणे येथील ‘अपेडा’चे महासंचालक, एमएसएमईचे सहायक संचालक, मैत्री कक्षाचे अधिकारी, इंडियन पोस्टचे अधिकारी, अधिक्षकीय कृषी अधिकारी, एसबीआयचे निर्यात वित्त पुरवठा व्यवस्थापक आदी तज्ज्ञांकडून निर्यात प्रक्रिया, उद्योग विकास, शासकीय योजना, एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) उपक्रम, निर्यात प्रोत्साहन योजना, वित्तपुरवठा सुविधा इत्यादी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्यातील एमएसएमई क्षेत्राची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करणे, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे तसेच निर्यातवृद्धीला चालना देणे या उद्देशाने राज्य व केंद्र शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. सर्व संबंधित उद्योजक, निर्यातदार व घटकांनी या कार्यशाळेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित