गुन्हेगारांची गय नको; अवैध मद्यविक्री, अंमली पदार्थ विक्री रोखा - पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

सुधारित पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा ! गुन्हेगारांची गय नको; अवैध मद्यविक्री, अंमली पदार्थ विक्री रोखा - पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले पोलिसांसोबतच राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषध प्रशासनाने दक्ष राहण्याच्या सूचना अंमली पदार्थांची विक्री आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार लातूर, दि. 20 : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत. सराईत गुन्हेगार, तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींवर कठोर कार्यवाही करावी. शहरातील ट्युशन एरियासह शाळा, महाविद्यालय परिसरात विनाकारण फिरणाऱ्या, दहशत माजविणाऱ्यांविरुद्ध आवश्यक कार्यवाही हाती घेण्याच्या सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज दिल्या. लातूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री श्री. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पोलिसांनी शहरातील विविध भागात अचानक कॉम्बिंग ऑपरेशन राबवून अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींवर, सराईत गुन्हेगारांवर कारवाई करावी. विशेषतः शहरातील वसतिगृहे, ट्युशन एरियासह इतर भागात सातत्याने पोलिस गस्त सुरू करावी. जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीला पायबंद करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त मोहीम हाती घ्यावी. अंमली पदार्थ, नशा करण्यासाठी वापरली जाणारी औषधे याची जिल्ह्यात विक्री होणार नाही, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तातडीने मोहीम हाती घ्यावी. ज्या परिसरात अवैध दारू, अंमली पदार्थ विक्री होत असल्याचे निदर्शनास येईल, त्या क्षेत्राच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. भोसले यांनी सांगितले. गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर तडीपारीची कार्यवाही करावी. कोणत्याही गुन्हेगाराची गय न करता जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे पालकमंत्री श्री. भोसले म्हणाले. बेकायदेशीरपणे शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्या, अशी शस्त्रास्त्रे विक्री करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. तसेच युवक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चुकीच्या मार्गापासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड यांनीही यावेळी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आवश्यक सूचना दिल्या. जिल्ह्यात एमपीडीए अंतर्गत कार्यवाही जलद गतीने करण्यात येत आहे. तसेच शाळा, महाविद्यालयातील प्राचार्य, हॉस्टेल चालक यांच्या मदतीने शहरात लवकरच विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी मोहीम राबविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. **

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत