लातूर येथे २८ फेब्रुवारी रोजी विधी सेवा महाशिबीर, शासकीय योजनांचा महामेळावा; नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे · प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व जिल्हाधिकारी यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा · विविध योजनांचे ५० पेक्षा अधिक स्टॉल; कायदेविषयक मार्गदर्शन

लातूर येथे २८ फेब्रुवारी रोजी विधी सेवा महाशिबीर, शासकीय योजनांचा महामेळावा; नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे · प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व जिल्हाधिकारी यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा · विविध योजनांचे ५० पेक्षा अधिक स्टॉल; कायदेविषयक मार्गदर्शन लातूर, दि. १८ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व लातूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता लातूर येथील रुक्मिणी मंगल कार्यालय येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. भारुका व जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत नुकतीच आढावा बैठक झाली. या बैठकीला लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, तदर्थ जिल्हा न्यायाधीश पी. पी. केस्तीकर, मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एन. पाटील, वरिष्ठ स्तर सह दिवाणी न्यायाधीश जे. सी‌. ढेंगळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्ही. एन. गिरवलकर यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. या महाशिबिरातून सामान्य नागरिकांना मोफत विधी सहाय्य, कायद्याबाबत जागृती, विविध शासकीय योजनांची माहिती, लाभार्थी नोंदणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील गरजू, वंचित व सामान्य नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. भारुका यांनी केले. या कार्यक्रमात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ वितरीत करण्यासोबतच शासकीय योजना व कायदेविषयक जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विविध शासकीय योजनांची माहिती आणि कायदेविषयक मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळण्याची संधी विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा या कार्यक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना मिळत आहे. यासोबतच आर्थिक फसवणूक, सायबर सुरक्षा, वाहतूक सुरक्षा यासारख्या विविध विषयांवर यावेळी मार्गदर्शन केले जाणार आहे. कृषी, पशुसंवर्धन, बचतगट यासारख्या विविध घटकांसाठी उपयुक्त माहिती देणारे ५० पेक्षा अधिक स्टॉल या कार्यक्रमात लावण्याचे नियोजन आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण, मार्गदर्शन याबाबत सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. *****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित