लातूर येथे मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी राज्य शासनाकडून 172 कोटी 87 लाख रुपये निधी मंजूर

 

·        निविदा प्रकिया सुरु; थोड्याच दिवसात होणार कामाला सुरुवात

·        क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी मानले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार

लातूर, दि. 25 (जिमाका) : लातूर हे मराठवाड्यातील शैक्षणिक हब असून शिक्षणासाठी येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. याठिकाणी मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयी-सुविधा असलेले वसतिगृह सारथीसंस्थेमार्फत उभारण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने 172.87 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे शिक्षणासाठी येणाऱ्या जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध होणार असल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी आभार मानले आहेत.

राज्य शासनाने बार्टीच्या धर्तीवर सारथीया संस्थेची निर्मिती केली असून या संस्थेमार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांना विविध सुविधा, सवलती  उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून लातूर येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणीसाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. सारथीचे विभागीय कार्यालय आणि अभ्यासिका, ग्रंथालय, प्रशिक्षण संस्था व वसतिगृह इमारतीसाठी राज्य शासनाने 172.87 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या इमारतीच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरु असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

सारथीमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या वसतिगृह, ग्रंथालय, अभ्यासिका इमारतीमुळे लातूर जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत होईल, असे ना. बनसोडे यांनी म्हटले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु