अनुसूचित जाती प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजना


लातूर, दि. 25  (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जाती प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे (आरईडीपी) आयोजन करण्यात येत आहे. 18 दिवस कालावधीच्या या कार्यक्रमात विविध उद्योग संधी, व्यक्तिमत्व विकास, शासकीय योजनांची माहिती, प्रकल्प अहवाल तयार करणे, हिशोब ठेवणे, उद्योगाचे व्यवस्थापन, कर्ज प्रकरण तयार करणे, यशस्वी उद्योगांची चर्चा, उद्योगांना भेटी आणि विविध विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. हे प्रशिक्षण मोफत असून यामध्ये 18 ते 40 वर्ष वयापर्यंत दहावी पास, नापास अनुसुचित जाती असलेल्या सर्व महिला व पुरुष यामध्ये भाग घेवू शकतात.

ज्यांना व्यवसाय करण्याची प्रबळ इच्छा आहे, ज्यांनी कधी शासनाच्या कोणत्याही  योजनेत कर्ज घेतलेले नाही, असे सर्वजण या प्रशिक्षणात भाग घेवू शकतात. यासाठी लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुल समोरील मिटकॉन कार्यालय येथे किंवा रियाज शेख (भ्रमणध्वनी क्र. 9552474777) यांच्याशी 30 नोव्हेंबर 2023  पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उद्योजकतेसाठी आवश्यक असलेले गुण व उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, शासकीय, निमशासकीय संस्थांच्या यंत्रणांच्या विविध कर्ज योजना, सोयी, सवलती आणि कार्यप्रणाली, विविध क्षेत्रातील उद्योग संधीबाबत मार्गदर्शन, सर्वेक्षण तंत्र, उद्योग व्यवसायाशी निगडीत कायदे व ते अंमलबजावणीची कार्यपध्दती याविषयी प्रशिक्षणात मार्गदर्शन केले जाईल. सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण, उत्पादनांच्या किमती, हिशोब व इतर लेखाविषयक बाबी, प्रकल्प अहवाल तयार करणे, मनुष्यबळाचे व्यवस्थापन, पणन व्यवस्थापन, उद्योग आधार याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार असून हे 18 दिवसांचे निवासी प्रशिक्षण असेल.

प्रशिक्षणासाठी निवडीच्या अटी व पात्रता

प्रशिक्षणार्थीची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल, उमेदवार हा अनुसूचित जाती प्रवर्गातील किमान 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा. तसेच त्याच्याकडे जातीचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. शैक्षणिक पात्रता किमान सातवी पास, विशेष कौशल्य असल्यास पात्रता शिथील करण्याचे अधिकार महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांना राहतील. दहावी पास उमेदवारांना तसेच महिलांना प्राधान्य राहील. उमेदवाराचे आधारकार्ड असणे आवश्यक आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा