‘युवा महोत्सव’मुळे युवकांच्या कलागुणांचा विकास

-         जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

लातूर, दि. 30 (जिमाका) :

युवा पिढी ही देशाची शक्ती आहे. त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी युवा महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमामुळे युवा वर्गाच्या कलागुणांचा विकास होण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे सांगितले.

क्रीडा व युवक सेवा उपसंचालक, लातूर जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा कृषि अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने दयानंद सभागृहात आयोजित जिल्हास्तर युवा महोत्सव 2023-24 च्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवसांब लाडके, दयानंद वाणिज्य महाविद्यालायचे प्राचार्य राजाराम पवार, आहारतज्ज्ञ प्रियांका शेंडगे यांची यावेळी उपस्थिती होती.


युवा वर्गाच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित युवा महोत्सवात विविध 13 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व स्पर्धकांनी मनात कोणताही न्यूनगंड न ठेवता आपले कलागुण याठिकाणी सादर करावेत. स्पर्धेत हार पदरी पडली तरी निराश न होता नव्या जोमाने आणि जिद्दीने पुन्हा प्रयत्न करावेत. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द आवश्यक आहे. आपले व्यक्तिमत्व घडण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करून पुढे जाणे आवश्यक आहे. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित युवा महोत्सवात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर लातूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व दिसण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षे घोषित केले आहे. युवकांना तृणधान्याचे महत्व कळावे, यासाठी युवा महोत्सवात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आपले आरोग्य चांगले राहिले तर आपण कोणत्याही स्पर्धेत टिकू शकतो. त्यामुळे पौष्टिक आहार आणि शारीरिक आरोग्यावर युवकांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.


सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्र हे आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देतात. युवा महोत्सवासारख्या उपक्रमांमुळे या दोन्ही क्षेत्रातील कलागुणांचा विकास होण्यासाठी मदत होते. त्यामुळे युवकांचे व्यक्तिमत्व सक्षम होण्यासाठी युवा महोत्सव उपयुक्त ठरेल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच मोबाईल, टीव्हीच्या स्क्रीनपासून युवकांना दूर ठेवण्यासाठी असे उपक्रम आयोजित होणे गरजेचे असल्याचे सांगितले.

जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. लकडे यांनी प्रास्ताविकामध्ये युवा महोत्सवाच्या आयोजनाचा उद्देश, महोत्सवाचे स्वरूप आणि या अंतर्गत आयोजित उपक्रम, स्पर्धांची माहिती दिली.












Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु