आंबिया बहारमध्ये डाळिंब, आंबा पिकासाठी विमा योजना लागू
लातूर, दि. 24 (जिमाका): सन 2023-24 या वर्षात आंबिया बहारमध्ये डाळिंब व आंबा या पिकासाठी पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना लातूर जिल्ह्यातील अधिसूचित तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळामध्ये लागू करण्यात आली आहे. ही योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेध प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्रात नोंदवल्या गेलेल्या हवामानाच्या तपशीलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल. लातूर जिल्ह्यात ही योजना एचडीएफसी. अर्गो जनरल इन्शुरन्स या विमा कंपनी मार्फत कार्यान्वित केली जात आहे.
जिल्ह्यातील अधिसूचित फळपिके व महसूल मंडळ
लातूर , औसा, निलंगा, रेणापूर, शिरुर अनंतपाळ, उदगीर, अहमदपूर, चाकूर, जळकोट, देवणी या सर्व तालुक्यातील महसूल
मंडळासाठी फळपिक आंबा यासाठी अंतिम दिनांक 31 डिसेंबर, 2023 आहे. तर संरक्षित रक्कम 1 लाख 40 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी
भरावयाचा हप्ता 16 हजार 800 रुपये इतका आहे.
डाळींब या पिकासाठी लातूर तालुक्यातील तांदूळजा, मुरुड, औसा तालुक्यातील औसा, लामजना, किनीथोट, किल्लारी, बेलकूंड, भादा, उजनी, निलंगा तालुक्यातील निलंगा, औराद शहाजनी, रेणापूर
तालुक्यातील कारेपूर, उदगीर तालुक्यातील नागलगाव, हेर, अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर, किनगाव, चाकूर तालुक्यातील
चाकूर, नळेगाव, वडवळ ना. या महसूल मंडळांमध्ये ही योजना लागू राहील. यासाठी विमा हप्ता
भरण्याची अंतिम मुदत 14 जानेवारी, 2024 पर्यंत आहे. विमा सरंक्षीत रक्कम 1 लाख 30 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी
भरावयाचा हप्ता 9 हजार 750 रुपये इतका आहे.
कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक असून कर्जदार
शेतकऱ्यांना या योजनेत भाग घेणे अथवा न घेणे बाबत संबंधित बँकेकडे विहित नमुन्यात
घोषणापत्र व अर्ज सादर करावा लागेल. अर्ज केला नसल्यास शेतकऱ्यांची संमती आहे, असे
गृहीत धरुन बँकेमार्फत विमा हप्ता कपात करण्यात येईल. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना
विहीत मुदतीत बँकेत किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे ऑनलाईन फळपिक विमा पोर्टल www.pmfby.gov.in च्या माध्यमातून सहभाग नोंदवावा लागेल. त्यासाठी अर्जदाराने
आपल्या अर्जासोबत आधारकार्ड अथवा आधार नोंदणी प्रत, जमीनधारक सातबारा, आठ अ उतारा व फळबागेचा (जीओ
टॅगिंग) केलेला फोटो, भाडेपट्ट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांचा करारनामा अथवा सहमतीपत्र आणि बँक
पासबुक प्रत सादर करुन प्रत्यक्ष ईलेक्ट्रानिक साक्षांकन करणे बंधनकारक आहे. अधिक
माहितीसाठी संबंधित विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी दिलीप जोगदंड (भ्रमणध्वनी क्र.
9850187014) यांच्याशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक
कृषि अधिकारी शिवसांब लाडके यांनी केले.
*****
Comments
Post a Comment