लातूर, दि.
3 (जिमाका) : भारत निवडणूक आयोग व राज्याचे मुख्य
निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार 1 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत
छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषीत केलेला आहे.
शनिवार, 4 नोव्हेंबर 2023 आणि रविवार, 5 नोव्हेंबर 2023 रोजी लातूर तालुक्यातील
सर्व मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या
मोहिमसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची
नियुक्ती करण्यात आली असून ते मतदान
केंद्रावर हजर राहणार आहेत.
ज्यांचे वय 1 जानेवारी, 2024 रोजी 18 किंवा त्यापेक्षा अधिक होत आहे, अशा व्यक्तींनी
मतदार यादीत नाव नसल्यास अर्ज नमुना नं. 6, अर्जदाराचा रंगीन फोटो, जन्म तारखेचा पुरावा म्हणून टी.सी.
अथवा पॅनकार्ड अथवा आधारकार्ड, रहिवासी पुरावा म्हणून लाईट बील पावती किंवा रेशन कार्ड किंवा आधारकार्ड
सादर करावे. मयत अथवा दुबार अथवा कायम स्थलांतरीत असल्यामुळे मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी
अर्ज नमुना नं. 7 भरून, त्यासोबत मयत
व्यक्तीचे मृत्यु प्रमाणपत्र, दुबार नोंद झाली असल्यास दुबार नोंदीचा पुरावा, कायम
स्थलांतरीत असल्यास सध्याचे राहत असलेल्या वास्तव्याचा पुरावा जोडावा.
मतदार यादीतील तपशीलात दुरुस्ती, पत्ता बदल, मतदान ओळखपत्र हरवले असल्यास अर्ज नमुना नं. 8 भरावा. त्यासोबत
नाव, वय, जन्म तारीख दुरुस्तीसाठी
आधारकार्ड किंवा पॅनकार्ड किंवा टी. सी, पत्ता बदलसाठी रेशनकार्ड किंवा लाईट बील
पावती किंवा ज्या तपशीलात दुरुस्ती करावयाची आहे, त्यासबंधीचा पुरावा जोडावा. मतदार
यादीशी आधार क्रमांक जोडणी करणे अर्ज नमुना नं.
6 ब भरून आधार क्रमांक, मतदार ओळखपत्र व मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.
मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सादर करावीत किंवा https://voters.eci.gov.in अथवा https://ceo.maharashtra.gov.in अथवा Voter Helpline
App या संकेतस्थळावरुन ऑनलाईन स्वरुपात मतदार
नोंदणी करावी, असे अवाहन लातूरच्या उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी रोहिणी
नऱ्हे-विरोळे आणि तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी सौदागर तांदळे यांनी
केले आहे.
*****
Comments
Post a Comment