उदगीर आणि जळकोट तालुक्यातील रस्ते विकासाला गती - क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

 

उदगीर आणि जळकोट तालुक्यातील रस्ते विकासाला गती

                   - क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

 

·        मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून उदगीर तालुक्यातील ४ आणि जळकोट तालुक्यातील २ कामांचे भूमिपूजन 

 

·        पांदण व शेतरस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना

 


लातूर, दि. २४ (जिमाका) : शेतमाल वाहतूक आणि दळणवण सुविधा बळकटीकरणासाठी   उदगीर आणि जळकोट तालुक्यातील रस्त्यांच्या कामाला गती देण्यात आली आहे. आतापर्यंत विविध योजनांमधून रस्ते कामांसाठी भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. हे सर्व रस्ते दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केल्या.


मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून उदगीर आणि जळकोट तालुक्यातील सहा रस्ते विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी ना. बनसोडे बोलत होते. उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विभागाचे कार्यकारी अभियंता आसिफ खैराडी, गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर, उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिध्देश्वर पाटील, सदस्य श्याम डावळे, बाळासाहेब मरलापल्ले, सर्जेराव भांगे यांच्यासह विविध गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


रस्ते हे विकास वाहिनी म्हणून काम करतात. त्यामुळे उदगीर आणि जळकोट तालुक्यात इतर मूलभूत पायाभूत सुविधा निर्मितीसोबतच रस्ते विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. पालकमंत्री पांदण रस्ता योजना, मातोश्री ग्रामसमृद्धी शेतरस्ता पाणंद योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, जिल्हा वार्षिक योजनेतून रस्ते विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उदगीर, जळकोट तालुक्यासाठी मंजूर केला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून आणखी २५ किलोमीटर लांबीच्या कामांना मंजुरी मिळाली आहे, तसेच २५ किलोमीटर लांबीच्या कामांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातही उदगीर आणि जळकोट तालुक्याला जास्तीत जास्त निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले. तसेच पालकमंत्री पांदण रस्ता आणि मातोश्री ग्राम समृद्धी शेतरस्ते पांदण योजनेतील कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.


उदगीर आणि जळकोट तालुक्यातील सर्व समाज घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी सिंचन, वीज, आरोग्य विषयक कामांना भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. ही सर्व कामे गतीने आणि दर्जेदार होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. जळकोट तालुक्यातील तिरू बॅरेजचे काम पूर्णत्वास आले असून लवकरच त्याचे लोकार्पण होईल. त्याचप्रमाणे दोन्ही तालुक्यातील प्रशासकीय इमारत, विविध समाजासाठी भवन उभारणे, पायाभूत सुविधा बळकटीकरणाला गती देण्यात आली असल्याचे ना. बनसोडे म्हणाले.

उदगीर आणि जळकोट तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशनची अंमबजावणी प्रभावीपणे करण्यात येत आहे. तसेच या दोन्ही तालुक्यातील १९२  गावांसाठी ६०० कोटी रुपयांची वॉटर ग्रीड योजना मंजूर करण्यात आली असून या योजनेचे काम गतीने सुरू आहे. त्यामुळे या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे, असे ना. बनसोडे म्हणाले. तसेच विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी ५ विद्युत उपकेंद्रे मंजूर केली असून त्यापैकी २ उपकेंद्रे पूर्ण झाली आहेत. तसेच ३ उपकेंद्राचे काम प्रगतीपथावर आहे, असे ते म्हणाले.

याप्रसंगी उपस्थित विविध गावांचे सरपंच, पदाधिकारी आणि नागरिकांनी रस्ते कामाला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ना. बनसोडे यांचे आभार मानले.

 

*सर्व महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा अग्रिम मिळवून देणार*

 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून उदगीर आणि जळकोट तालुक्यातील काही महसूल मंडळांमध्ये विमा अग्रिम मंजूर करण्यास विमा कंपनी टाळाटाळ करीत आहे. मात्र सर्व महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा अग्रिम मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे ना. बनसोडे म्हणाले. तसेच राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या महसूल मंडळाच्या यादीत समाविष्ट नसलेल्या नागलगाव, मोघा आणि तोंडार या महसूल मंडळांचाही समावेश दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या मंडळांच्या यादीत करण्याचा निर्णय लवकरच जाहीर होईल, असे त्यांनी सांगितले.

 

*उदगीर तालुक्यातील विविध ४ रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन*

 


उदगीर तालुक्यातील राज्यमार्ग-२६८ ते डांगेवाडी रस्ता कामाचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून २.६४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच राज्यमार्ग-२४९ (तोंडार पाटी) ते हंगरगा-क्षेत्रफळ या ६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामासाठी सुमारे ५.७३ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजनही ना. बनसोडे यांच्या हस्ते झाले. मोघा ते रावणगाव या रस्त्याच्या कामाचेही त्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या कामासाठी सुमारे ६.२५ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. यासोबतच राज्य मार्ग ६३ ते चवळे तांडा, मल्लापूर ते मल्लापूर तांडा या रस्त्याच्या सुमारे ३ कोटी ५ लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजनही ना. बनसोडे यांच्या हस्ते झाले.

 

*जळकोट तालुक्यातील २ रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन*

 


जळकोट तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग-५४ ते जिल्हा सरहद्द हिप्परगा रस्ता या सुमारे २.६२ कोटी रुपयांच्या कामाचे, तसेच तालुका सरहद्द शेलदरा - सोरगा-वडगाव-होकर्णा-वांजरवाडा ते राज्यमार्ग २५१ ते इतर जिल्हा मार्ग ५४ या सुमारे ३.८१ कोटी रुपयांच्या रस्ते कामांचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

****




 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा