कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे पुरावे तपासणीसाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष कार्यान्वित

 



लातूर दि. 6 (जिमाका) : राज्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी मिशन मोडवर मोहीम राबविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा- कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

तपासणी केलेली कागदपत्रे व नोंदी मिळालेली कागदपत्रे याची निर्दोष यादी तयार करण्यासाठी महसूल प्रशासन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील यादव, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार आणि महसूल कर्मचारी युद्धपातळीवर काम करीत आहेत. राज्यात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:हून कुणबी नोंदी तपासण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घ्यावी, त्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी आणि त्यांच्या नियंत्रणाखाली कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून द्यावी. त्यांना आवश्यक ते मनुष्यबळ, साधनसामुग्री देखील तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार उपजिल्हाधिकारी अहिल्या गठाळ यांच्यावर विशेष कक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मोडी लिपी आणि उर्दू लिपी तज्ज्ञ यांच्याकडून लिप्यांतर करण्याचे काम

लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यातील कुणबी नोंदी तपासण्यासाठी  जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आदेश दिले असून सहा मोडी लिपी आणि उर्दू लिपी तज्ज्ञ यांच्याकडून लिप्यांतर करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व जुन्या नोंदी बहुतांशी मोडी लिपीत आहेत, तर काही प्रमाणात उर्दू लिपीत आहेत. या सर्व नोंदीचे लिप्यांतर करण्याचे काम जिल्ह्यातील दहाही तालुक्यात युद्धपातळीवर सुरु आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु