जिल्ह्यात क्लस्टर
स्वरुपात रेशीम शेतीसाठी प्रयत्न करावेत-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
·
रेशीम रथाला
जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी
·
रेशीम लागवडीसाठी
20 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना करता येणार नोंदणी
लातूर दि. 20 (जिमाका) : कमी पाण्यामध्ये
अधिक उत्पन्न देणारी रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना रेशीम शेतीविषयी माहिती देवून त्यांना
रेशीम शेतीसाठी प्रोत्साहित करावे. तसेच सध्या रेशीम शेती होत असलेल्या परिसरात
रेशीम शेतीचे क्लस्टर निर्मितीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा
ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘महा रेशीम अभियान 2024’ अंतर्गत रेशीम शेतीच्या प्रचार आणि
प्रसारासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाने तयार केलेल्या रेशीम रथाच्या उद्घाटन
प्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. या कार्यक्रमाला रोहयोच्या
उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवसांब लाडके, जिल्हा रेशीम विकास अधिकारी एस.
बी. वराट, यशदाचे प्रशिक्षक रवींद्र इंगोले, कृषि उपसंचालक महेश क्षीरसागर, जिल्हा
रेशीम कार्यालयाचे विवेकानंद पेठकर, सतीश सूरकर, संतोष पवार, रोहित देशमुख, राहुल
कदम, प्रगतशील शेतकरी सिध्देश्वर कागले, शौकत शेख, चॉकीधारक आकाश जाधव यावेळी उपस्थित
होते.
पारंपारिक शेतीपेक्षा रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. ऊस
शेतीपेक्षा कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीसाठी शासनामार्फत महात्मा
गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सुमारे 3 लाख 97 हजार रुपयांपर्यंत
अनुदान दिले जात आहे. महा रेशीम अभियानाच्या माध्यमातून गावोगावी जावून रेशीम
शेतीविषयी शेतकऱ्यांना माहिती द्यावी. यावर्षी रेशीम विभागासोबतच कृषि विभाग आणि
जिल्हा परिषदेमार्फत संयुक्तपणे रेशीम लागवडीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याने
तिन्ही विभागणी समन्वयाने काम करून जिल्ह्यात जास्तीत जास्त क्षेत्र रेशीम
शेतीखाली आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे
यांनी केल्या.
जिल्ह्यात 20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2023 या कालावधीत महा रेशीम अभियान
राबविले जात आहे. या काळात रेशीम शेतीची माहिती देण्यासाठी जिल्हा रेशीम
कार्यालयाने तयार केलेला रेशीम रथ पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 52 गावांमध्ये
जावून शेतकऱ्यांची सभा घेवून त्यांना रेशीम शेतीबाबत माहिती देणार आहे. या दरम्यान
रेशीम शेती करण्यास इच्छुक शेतकऱ्यांची नोंदणीही करून घेतली जाणार आहे.
जिल्ह्यासाठी प्रपात लक्षांक मर्यादित असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त
शेतकऱ्यांनी 20 डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन श्री. वराट यांनी यावेळी केले.
******
Comments
Post a Comment