पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हास्तरीय योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा
पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हास्तरीय योजनांसाठी
ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा
लातूर, दि. 21 (जिमाका) : राज्याच्या
ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवांना
स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध देत
राज्याचे ग्रामीण अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा प्रयत्न पशुसंवर्धन विभागामार्फत केला
जात आहे. या विभागाच्या विविध योजना, उपक्रमाच्या
माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध
होत आहे. विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रक्रिया
अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्षे
ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पद्धत सुरू करण्यात आली
आहे. याच धर्तीवर जिल्हास्तरीय विविध योजनांसाठीही संगणक प्रणाली लागू करण्यात आली
आहे.
संगणक प्रणालीमध्ये एखाद्या योजनेसाठी अर्ज केल्यास
दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतिक्षा यादी सन
2021-22 पासून पुढील पाच वर्षापर्यंत म्हणजे सन 2025-26 पर्यंत लागू ठेवण्याची सोय
केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून
त्याची प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळणार
असल्याने लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबी करिता नियोजन करता येणे शक्य होणार
आहे.
सन 2023-24 मध्ये योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत
नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत
दुधाळ गाई, म्हशींचे गट वाटप
करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, एक हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या
संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25+3 तलंगा गट वाटप या
योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2023- 24 या वर्षात राबवली
जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री
किंवा शेळी पालन यापैकी ज्या बाबीसाठी अर्ज करायचा आहे, त्याची निवड करण्याची
सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक शेतकरी बांधव
सुशिक्षित बेरोजगार युवक- युवती, महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन
पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी असा करा ऑनलाईन अर्ज
पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या
योजनांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा https//ah.mahabms.com या संकेतस्थळावर आणि
गुगल प्ले-स्टोअरवरील AH.MAHABMS या
अँड्रॉइड मोबाईल ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे. 9 नोव्हेंबर 2023 ते 8
डिसेंबर 2023 या कालावधीत विविध योजनासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. याबाबत
अधिक माहितीसाठी 1962 किंवा 1800-233-0418 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धतीचा
संपूर्ण तपशील संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲप वर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन
पद्धतीने स्वीकारले जातील. या संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात
आले असून अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहिती बाबत
पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अर्जदारांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविला जाणार संदेश
पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वतःचे मोबाईलचा वापर
करावा, अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या
मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे
अर्जदारांनी योजनेअंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये व एकदा ऑनलाईन अर्ज
केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. योजनेबाबत अधिक
माहितीसाठी संबंधित तालुक्याच्या पंचायत समितीमधील पशुधन विकास अधिकारी, जिल्हा
पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय
अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन
विभागाने केले आहे.
****
Comments
Post a Comment