प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना लातूर जिल्ह्यातील पात्र कारागिरांच्या नोंदी करून त्यांना कौशल्य प्रशिक्षण देणार

 



प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना

लातूर जिल्ह्यातील पात्र कारागिरांच्या नोंदी करून त्यांना कौशल्य प्रशिक्षण देणार

लातूर दि. 8(जिमाका)- प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेंतर्गत शासनाकडून आर्थिक मदत व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेत विविध 18 पारंपारिक कामांचा समावेश आहे. जिल्ह्यातील पात्र कारागिरांची नोंदणी झाल्यानंतर 1 डिसेंबर ते 30 डिसेंबर प्रशिक्षण घेतले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिली.

  यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी उपस्थित होते.

लातूर जिल्ह्यातील सर्व 784 ग्रामपंचायत स्तरावरून सरपंचाचे   रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु असून प्रक्रिया अधिक गतिमान करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली. तसेच या संदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी 20 नोव्हेंबर रोजी बैठक होईल. त्या बैठकीत 1 डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत या पात्र कारागिरांना कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणाची रूपरेषा ठरवली जाईल अशी माहितीही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.

      या योजनेंतर्गत सुतार,लाकडी होडी (नाव) तयार करणे, कुलूप तयार व दुरुस्त करणारे, टूलकीट तयार करणारे, सोनार कारागीर,कुंभार, मूर्तिकार,गवंडी काम करणारे मिस्त्री, चर्मकार, चटई व झाडू तयार करणारे, पारंपारिक बाहुल्या, खेळणी तयार करणारे, नाव्ही, धोबी, फुलांच्या माळा बनविणारे, मासे पकडण्याच्या जाळया तयार करणारे,अवजारे बनविणारे, शिलाई काम करणारे शिंपी आणि लोहार यांचा समावेश आहे. या योजनेतून व्यवसाय सुरु करण्यासाठी एक लाख रुपयांचे कर्ज पहिल्या टप्प्यात आणि व्यवसायाच्या विस्तारासाठी दोन लाखापर्यंत कर्ज दुसऱ्या टप्प्यात उपलब्ध होणार आहे. व्यवसायासाठी केवळ 5 टक्के व्याजदराने हे कर्ज मिळणार आहे.

प्रशिक्षणार्थींना दररोज 500 रुपये विद्यावेतन

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेत 18 प्रकारचे प्रशिक्षण घेण्याचा कारागिरांना दररोज 500 रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. तसेच पी.एम. विश्वकर्मा प्रमाणपत्र, ओळख पत्र दिले जाणार आहे.सोबतच 15 हजार रुपयांचे टूलकिट प्रोत्साहन, डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. योजनेच्या लाभासाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

पात्रतेचे निकष :- कारागीर व्यक्ती हा भारताचा नागरिक असावा, योजनेत समाविष्ट 18 व्यवसायापैकी कोणत्याही एकाशी संबंध असणे आवश्यक आहे, कारागीर व्यक्तीचे वय 18 वर्षापेक्षा जास्त आणि 50 वर्षापेक्षा कमी असावे. मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असावे. योजनेत समाविष्ट 140 जातींपैकी कोणत्याही एका जातीचा कारागीर व्यक्ती असणे आवश्यक आहे.

ही कागदपत्रे आवश्यक:- प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी कारागीर व्यक्तीकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, बँकेचे पासबुक आणि मोबाईल नंबर आवश्यक आहे.

अशी करा नोंदणी :- योजनेचा लाभ घेण्यासाठी  pmvishwakarma.gov.in

या अधिकृत संकेतस्थळावरील अप्लाय ऑनलाईन लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर नोंदणीक्रमांक आणि पासवर्ड संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवर एसएमएसव्दारे आल्यानंतर नोंदणी फॉर्म पूर्णपणे वाचून भरावा. भरलेल्या फॉर्मसह सर्व कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावी.

 

                                                    ****

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु