जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई गृहीत धरून नियोजन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना • प्रकल्पातील एकूण पाणीसाठा 75 टक्याच्या खाली असेल त्या प्रकल्पातील पाणी राखीव लातूर, दि. 30 (जिमाका) : जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या एकूण 171 प्रकल्पामध्ये सध्या केवळ 28.52 टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे.ज्या प्रकल्पात शंभर टक्के पाणी साठा आहे अशा प्रकल्पातून 25 टक्के पाणी उपसा करता येईल. ज्या प्रकल्पात 75 टक्यापेक्षा कमी पाणी आहे तिथे पाणी पूर्णपणे राखीव राहिल. टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी आपल्याकडे असलेल्या टॅंकरची दुरुस्ती करून घ्यावी, तसेच गावोगावचे हातपंप दुरुस्त करून घ्यावेत, जिथे जिथे राखीव पाणी ठेवले आहे, त्याची सक्त रखवाली करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांना दिली. आज जिल्ह्यातील सर्व यंत्रणांच्या टंचाई संदर्भातील आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर ( दूरदृश्य प्रणालीद्वारे ), अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे यांच्या सह पाटबंधारे, ग्रामीण पाणी पुरवठा यासह सर्व यंत्रणा प्रमुख यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या एकूण 171 प्रकल्पात त्यात 2 मोठे प्रकल्प, 8 मध्यम,134 लघु व 27 बंधारे आहेत. यापैकी ज्या प्रकल्पातील पाणीसाठा 75 टक्या पेक्षा कमी असेल अशा प्रकल्पातील पाणी हे केवळ पिण्याच्या प्रयोजनासाठी आरक्षित केले आहे. त्यामुळे या सर्व प्रकल्पातील पाण्याचा उपयोग जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार केवळ पिण्याच्या पाण्यासाठी होईल इतर कोणत्याही प्रयोजनासाठी पाण्याचा वापर करू नये असे सक्त आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी दिले.तसेच नागरिकांनी अतिशय काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन लातूर पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे. पिण्याच्या प्रयोजनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रयोजनासाठी पाण्याचा वापर होत असल्यास तात्काळ दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असून मोटार जप्तीची कारवाई सूरु आहे. पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन, वापर होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन लातूर पाटबंधारे विभाग क्र. 1 व 2 चे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु