यशकथा : 'जगण्याच्या स्पर्धेनी व्यवसाय शिकवीला, आता इतरांना उमेद देतो'




कोविड काळात अख्ख जग थांबलं होतं, त्यावेळी लातूर मधला एक युवक व्यवसायाचे गणित डोक्यात घेऊन, पायाला भिंगरी लावून व्यवसायात उतरत होता. कोविड काळात अनेक छोटेमोठे व्यवसाय दुर्देवाने बंद पडले. पण श्रीकांत रामकिशन शिंदे या युवकाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या सहकार्याने ममता डिजिटल फर्म उभं करून अनेक युवकांना व्यवसायाचा मंत्र दिला त्याची ही प्रेरणादायी कथा आहे...!! ' रामकिशन शिंदे हे माझे वडील लहान असताना त्यांचे जन्मगाव कारसा सोडून लातूरला आले. गावाशी नाळ जोडून ठेवणारी शेतीच नसल्यामुळे जगण्याचा संघर्ष पाचविला पूजलेला होता. त्यामुळे न कळत्या वयात वडील खिळे जोडणाऱ्या प्रीटिंग प्रेस मध्ये नोकरीला लागले. त्या तुटपुंज्या पगारावर दोन मुलं आणि एक मुलगी शिकवली.. पुढे 2002 मध्ये त्यांनी स्वतःचा प्रीटिंगचा व्यवसाय सुरु केला. तीन मुलांना शिकवलं त्यातल्या दोघांना शिक्षक केलं. तर मला सोबत ठेवून व्यवसायाचे बाळकडू दिले.. बी. कॉम करून.. मी व्यवसाय करायचे हे ठरवूनच व्यवसायात उतरलो ' हे अत्यंत आत्मविश्वासपूर्ण श्रीकांत शिंदे सांगत होता. बी.कॉम करत असताना वडिलांचे प्रीटिंग प्रेसचे काम बघत होतो. 

डिजिटल युग सुरु झाले होते. ऑफसेटवरली कामं शिफ्ट व्हायला सुरुवात झाली होती. माझ्या मनात व्यवसाय कोणता करावा याचे गणित सुरु असताना मुंबईत एका प्रदर्शनात गेलो, तिथे मला फ्लेक्स मशीन पाह्ययला मिळाले. माझ्या मनाने उजवा कौल दिला आणि मी हा व्यवसाय करायचे ठरवले. वडिलांचे प्रिंटिंग प्रेस बंद करायचे ठरवून.. या व्यवसायाचा अभ्यास सूरु केला. 2019 ला फाईल तयार करून मशीनसाठी लागणारे साडे नऊ लाख रुपये पंजाब नॅशनल बँकेकडे कर्ज रूपात मागितले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळकडून व्याज परतावा योजना मंजूर करून घेतल्यामुळे धैर्य वाढले होते. कर्जाचे व्याज मिळणार असल्यामुळे हिम्मतीने व्यवसाय उभं करायचे ठरवून कर्ज घेतले. आणि 5 फेब्रुवारी 2020 ला व्यवसाय सुरु केला. ज्या दिवशी व्यवसाय सुरु केला त्या दिवसांपासून मागे वळून पाहिलं नसल्याचे श्रीकांत सांगत होता. डझनभर लोकांना देतो रोजगार 2020 ला मोठ्या हिंमत्तीने सगळे शिकून घेऊन व्यवसायाला सुरुवात केली. डिझाईन बनवण्या पासून ते फ्लेक्स प्रिंटिंग पर्यंत सर्व शिकून घेतलं. दोन युवकांना प्रत्यक्ष रोजगार दिला. 8 ते 10 लोकांना अप्रत्यक्ष रोजगार दिला. त्यात फ्लेक्ससाठी लागणाऱ्या फ्रेम पासून ते फ्लेक्स बसवणाऱ्या लोकांपर्यंतचा समावेश आहे. महिन्याला या व्यवसायाची उलाढाल 4 ते 5 लाख रुपये एवढी आहे. निव्वळ नफा 80 हजारा पर्यंत जातो. एका नोकरदाराएवढे मालक म्हणून कामावतो. याचे पूर्ण समाधान आहे. महानगरपालिकेचा गाळा 24 लाख रुपये मोजून मालकीचा करून घेतला आहे. हे सगळं सांगतांना मोठा आत्मविश्वास श्रीकांतच्या बोलण्यात जाणवत होता. 

महामंडळाचा व्याज परतावा मोठं अवसान देतो 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने जो व्याज परताव्याची हमी दिली. त्याचेवेळी मीं व्यवसाय उभं करण्याची आर्धी लढाई जिंकली होती. माझ्यात आत्मबळ निर्माण करण्यासाठी या हमीचा खूप मोठा वाटा होता. आज पर्यंत जवळपास अडीच लाख रुपये या व्याज परताव्यातून मिळाले आहेत. या योजनेचा लाभधारक आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो. एक योजना किती मोठा आधार देऊ शकते हे मीं अनुभवलं. आता मीं अनेकांना हीं योजना काय आहे, याचे फायदे काय आहेत हे सांगतो. जवळपास पाच एक मित्रानी या योजनेच्या बळावर व्यवसाय उभा केल्याचे श्रीकांत शिंदे सांगतो. हे सांगताना 'अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ' आणि या योजनेचे जिल्हा समन्वयक प्रशांत पाटील यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. इतर युवकांना देतोय कानमंत्र नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना हा सुविचार नसून ते कृतीत उतरवून त्यातून किती मोठं समाधान मिळतं हे मी आज अनुभवतोय हे सांगताना श्रीकांत युवकांना आवाहनही करतोय.. ' मित्रहो व्यवसाया करण्यासाठी जिद्द, मेहनत आणि त्या व्यवसायातले बारकावे शिकून घ्या.. तुम्हाला कितीही मोठे स्पर्धक समोर आले तरी तुमचं व्यवसायातलं स्थान आढळ राहिल. त्यामुळे व्यवसाय उभं करून आत्मभान असणारे मालक व्हा असा मोलाचा सल्ला देतो. 

 - युवराज पाटील जिल्हा माहिती अधिकारी, लातूर

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु