‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पोहचली लातूर जिल्ह्यात ;

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाले उदघाटन

 

  साठ दिवस लातूर जिल्ह्यातील गावागावात सरकारच्या योजना घेऊन पोहचेल यात्रा

ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद आणि शहरासाठी नगर विभाग असेल नोडल

 


लातूर , दि.24  ( जिमाका) : शासनाच्या विविध विभागांच्या प्रमुख योजना  समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचाव्यात तसेच या योजनेपासून वंचीत राहिलेल्या पर्यंत हा लाभ पोहचावा यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही विशेष मोहीम  24 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत लातूर जिल्ह्यात राबविली जाईल.यासाठी शासनाच्या सर्व यंत्रणा यासाठी सहकार्य करणार आहे. ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद आणि शहरी भागासाठी नगर विकास विभाग समन्वयक म्हणून काम करणार आहेत. ह्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी ग्रामपंचायत पासून ते महानगरपालिकेपर्यंत सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले.

   


या यात्रेच्या रथांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या ' विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नगर विकास विभागाचे सहआयुक्त रामदास कोकरे,जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ,नियोजन विभागाचे सहायक नियोजन अधिकारी शंकर साबरे, वामन जाधव,माहिती आणि प्रसारण विभागाचे अधिकारी अंबादास यादव उपस्थित होते.

 


   या मोहिमेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनेंतर्गत पात्र असलेल्या, परंतु अद्यापपर्यंत प्रत्यक्ष लाभ न मिळालेल्या लोकांपर्यंत या योजना पोहचविणे, या योजनाच्या माहितीचा प्रसार आणि योजनाबद्दल जागृती निर्माण करणे, या योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांशी संवाद साधून त्यांचे अनुभव व सूचना जाणून घेणे हे या 'विकसित भारत संकल्प यात्रे'चा मुळ उद्देश आहे.


 'विकसित भारत संकल्प यात्रे'साठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली असून ही समितीचे सहअध्यक्ष जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आहेत. तर निवासी उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव असणार आहेत. या समिती मध्ये महानगरपालिका आयुक्त, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत ), सर्व मुख्याधिकारी नगर परिषद, नगर पंचायत, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, आरोग्य उपसंचालक, जिल्हा क्रीडा अधिकारी इत्यादी अधिकारी सदस्य आहेत. यात्रा कुठे कुठे जाणार आहे याचे ग्रामीण भागाचे नियोजन जिल्हा परिषदेने केले असून शहराचे नियोजन नगर विकास विभागाने केले आहे.

                                           ड्रोन फवारणीचे झाले प्रात्यक्षिक

राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स यांच्या टीम कडून गावागावात मोठ्या ड्रोन द्वारे फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार असून या ड्रोनला वीस लिटर एवढ्या क्षमतेची टाकी बसविण्यात आली असून या द्वारे अत्यंत कमी वेळात आणि कमी रसायनात फवारणी होते. जिल्हाधिकारी यांच्या समोर हे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. त्या वेळी  जिल्हाधिकारी यांनी या ड्रोनची सर्व माहिती विचारून घेतली.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा