गणेशोत्सव -2022 शांतता समितीची आढावा बैठक संपन्न गणेशोत्सव साजरा करतांना गणेश मंडळांनी कायद्याचे पालन करुन शांतता, समन्वय व सहकार्याने उत्साहात साजरा करु या ..! - जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे
गणेशोत्सव -2022 शांतता
समितीची आढावा बैठक संपन्न
गणेशोत्सव साजरा करतांना
गणेश मंडळांनी कायद्याचे पालन करुन शांतता,
समन्वय व सहकार्याने उत्साहात
साजरा करु या ..!
- जिल्हा पोलीस अधीक्षक
निखील पिंगळे
*लातूर, दि. 18 (जिमाका):* लातूर जिल्ह्याला आगळा-वेगळा असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. तो वारसा आणि संस्कृती आपण टिकवलेलीच आहे, ती गणेशोत्सवामध्येही कायम ठेवणार आहोत. लातूर जिल्हा हा शांतताप्रिय असलेला जिल्हा आहे. त्यासाठी जिल्ह्यातील गणेशोत्सव -2022 साजरा करीत असतांना गणेश मंडळांनी कायद्याचे पालन करुन शांतता, समन्वय व सहकार्याने हा उत्सव साजरा करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित गणेशोत्सव-2022 च्या पार्श्वभुमीवर सर्व समाजात एकोपा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व शासनाने दिलेल्या विविध सूचनांच्या बाबतीत शांतता समितीची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, अप्पर जिल्हाधिकारी अनुराग जैन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, एएसपी निकेतन कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदे, पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच आदि विविध विभागाच्या विभाग प्रमुख, यासोबत जिल्ह्यातील गणेशोत्सवाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.
जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, गणेश मंडळांनी गणेशोत्सव -2022 साजरा करत असतांना डॉल्बी, डीजे स्पीकर लावत असतांना त्याचा आवाज 75 डिसीबलपेक्षा जास्त नसावा. तसेच ठरलेल्या मार्गावरुनच विजर्सन करण्यात यावे. गणेश विसर्जनाच्या मार्गात कांही बदल झाला, असेल तर आपणांस त्या-त्या वेळी आपल्या गणेशोत्सवाच्या पदाधिकाऱ्यामार्फत कळविण्यात येईल. गणेशमुर्तीची स्थापना करीत असतांना ती चार फुटापर्यंतच्या उंचीची असावी. सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कांही अडचणी असल्यास अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधावा. तसेच गणेशोत्सवाबाबत शासनाकडून नवीन मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या तर त्या सुचनांचे गणेश मंडळांनी पालन करावे. तसेच गणेश मंडळांनी समाजपयोगी उपक्रम राबवावेत यामध्ये आप-आपल्या परिसरात सीसीटीव्ही बसविण्याचाही उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करावा.
गणेश मंडळांनी गणेशोत्सव
- 2022 मध्ये "माझा गणेश, माझा मताधिकार " स्पर्धा
आणि वृक्ष लागवड संवर्धनाचा
नवा पॅटर्न राबवावा
वैयक्तिक (घरगुती गणेशोत्सव सजावट), सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी निवडणूक आयोगाच्या "माझा गणेश माझा मताधिकार " गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा. तसेच जिल्ह्यात वनक्षेत्र 0.6 अच्छादन आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येवून नैसर्गिक संपत्ती वाढविली पाहिजे. त्यासाठी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीचा संकल्प करावा आणि प्रत्येक गणेश मंडळांनी वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घ्यावा, असे अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी आवाहन केले. या बैठकीचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
****
Comments
Post a Comment