लातूर जिल्ह्यात स्वराज्य महोत्सव मोठ्या उत्साहात सुरु

 

आज पासून गावोगावी जाणार एल.ई.डी.रथ, दाखवणार मराठवाडा मुक्तीची गौरव गाथा

 

स्वराज्य महोत्सव खुली निबंध स्पर्धा, आरोग्य शिबीर,देशभक्तीपर गाणे, चित्रपट, प्रभात फेऱ्या यातून संपूर्ण जिल्ह्यात "घरोघरी तिरंगा " चैतन्याचे वातावरण

 


लातूर दि.10 ( जिमाका )
लातूर जिल्हा प्रशासनाकडून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुका मुख्यालयात, गावोगावी कार्यक्रम सुरु करण्यात आले आहेत. आज जिल्हा परिषदेतून दोन दृकश्राव्य एल ई डी रथांना झेंडा दाखविण्यात आला. ते दोन्ही रथ जिल्ह्यात गावोगावी फिरणार आहेत. त्यात देशभक्ती पर चित्रफिती, जिंगल्स आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरव गाथा दाखविली जाणार आहे. आज जिल्हा परिषदेत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तसेच खुली निबंध स्पर्धा ठेवली आहे. गावागावात प्रभात फेरीचे आणि इतर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

             


या सर्व कार्यक्रमाला जिल्हा परीषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, उप मुख्य कार्यकारी दत्तात्रय गिरी,प्राथमिक शिक्षणाधिकारी दशवंत,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, कृषी विकास अधिकारी चोले, जिल्हा पशुसंवरधन अधिकारी डॉ पडीले,  सहायक गट विकास अधिकारी पंचायत समिती मुंडे, विवेक सौताडेकर उपस्थित होते.

गावोगावी जाणार एल.ई.डी.रथ


लातूर जिल्ह्यातील गावोगावी हा एल.ई. डी. रथ जाणार असून त्यात स्वराज्य महोत्सवांतर्गत हर घर तिरंगा याच्या चित्रफीती, झेंडा कसा फडकवावा त्याची संहिता दृकश्राव्य माध्यमातून सांगणारी चित्रफित, मराठवाडा मुक्ती संग्रामावरची 52 मिनिटाची गौरव गाथाही दाखविली जाणार आहे.

नव्या पिढीला स्वातंत्र्याचे मोल कळावे, स्वातंत्र्यासाठी किती तरी स्वातंत्र्यविरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. शेकडो लोकांनी तुरुंग, अन्याय अत्याचार सोसून हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलं आहे. हे पुढल्या पिढीला कळावे यासाठी हे या स्वराज्य महोत्सवातील कार्यक्रमाचे नियोजन आहे.

स्वराज्य महोत्सव आरोग्य शिबीर

 


स्वराज्य महोत्सवांतर्गत आज जिल्हा परिषदेत पत्रकार , त्यांचे कुटुंबिय, इतरांसाठी बूस्टर डोस देण्यासाठी तसेच रक्त तपासणी शिबीर घेण्यात आले असून त्यात कोलस्ट्रॉल, तुमच्या रक्तातली साखर हे सगळे मोफत तपासणी केली जात आहे.

खुली निबंध स्पर्धा

             मी तिरंगा बोलतोय, 2047 चा अपेक्षित भारत , स्वातंत्रोत्तर काळातील भारत  या तीन विषयावर खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  त्यासाठी कोणत्याही वयाचे बंधन नाही. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

गावोगावी प्रभात फेरीचे आयोजन


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गावोगावी  प्रभात फेरी काढून "घरोघरी तिरंगा " लावण्याचे आवाहन करण्यात येत असून लोकांचा या प्रभात फेरीला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

 

                                                                  0000




Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा