आरोग्यदायी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन जिभेचे चोचले पुरविणारे पदार्थ शरीराला अपायकारक ; कमी चव असणाऱ्या रानभाज्या शरीराला मौल्यवान घटक पुरविणाऱ्या आरोग्यदायीनी - डॉ.प्रा. अरुण गुट्टे

 

आरोग्यदायी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन

जिभेचे चोचले पुरविणारे पदार्थ शरीराला अपायकारक ;

कमी चव असणाऱ्या रानभाज्या शरीराला मौल्यवान घटक पुरविणाऱ्या आरोग्यदायीनी

                                                 - डॉ.प्रा. अरुण गुट्टे

लातूर दि.13 ( जिमाका ) एकेकाळी शेतात आणि माळरानावर येणाऱ्या रानभाज्या हा गावोगावचा पावसाळ्यातला आहार होता, त्याची फारकत घेतली जिभेचे चोचले पुरविणाऱ्या फास्ट फुडने रस्त्यावरची आणि पोटाची जागा व्यापली आणि अनेक व्याधीचा जन्म झाला असे प्रतिपादन वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ.प्रा. अरुण गुट्टे यांनी व्यक्त केले.

कृषी विभागाच्या "आत्मा " यंत्रणाकडून कल्पतरू मंगल कार्यालय, औसा रोड लातूर येथे आयोजित केलेल्या जिल्हा स्तरीय रानभाज्या महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, स्मार्ट चे विभागीय नोडल राजेंद्र कदम, कृषी विकास अधिकारी सुभाष चोले, आत्माचे प्रकल्प उपसंचालक रविंद्र पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी आर‌. टी. जाधव, तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत, संजय नाबदे, कृषी पर्यवेक्षक सूर्यकांत लोखंडे उपस्थित होते.

आ.बाबासाहेब पाटील यांनी दिली भेट

अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी थेट शेतकरी ते ग्राहक असलेल्या या रानभाज्या महोत्सवाला भेट देऊन सर्व स्टॉल धारकांची विचारपूस केली. रानभाज्या आरोग्यदायी असल्यामुळे पावसाळ्यात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नाचे कौतुक करून असे महोत्सव काळाची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

रानभाज्या या तुमच्या शरीरातील साखर कमी करणाऱ्या असतात, हल्लीचे आपण खात असलेले अन्न घटकामध्ये मोठ्या प्रमाणात शुगर असते त्यामुळे लठ्ठपणा आणि त्यातून वेगवेगळया आजाराची साखळी तयार होत आहे. आता आपल्याला खरंच निरोगी आरोग्य हवे असेल तर पुन्हा त्या नैसर्गिक आहाराकडे वळावे लागेल त्या दृष्टीने असे रानभाज्या महोत्सव त्यात महत्वाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा गुट्टे यांनी यावेळी व्यक्त केली.

रानभाज्या शरीराला अत्यंत पोषक असल्यामुळे लोकांपर्यंत पोहचाव्या म्हणून शासनाकडून मागच्या तीन वर्षांपासून महान क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले जाते. शहरात या रानभाज्या मिळत नाहीत, त्यांना या सहज सुलभ उपलब्ध व्हाव्यात म्हणून हा महोत्सव शहरात आयोजित केला जातो. यातून शहरातल्या लोकांना या आरोग्यदायी भाज्यांची ओळख पटावी शेतकऱ्यांनाही यातून दोन पैसे मिळावे आणि पावसाळ्यात या भाज्यांची मागणी वाढावी या हेतूने हा रानभाज्या महोत्सव आयोजित केला जातो हेही जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले.

बाटली बंद आणि पाकीट बंद आहार आपल्या शरीरातला समतोल बिघडण्यास कारणीभूत ठरत असून आपली प्रतिकारशक्तीलाही कमजोर करत आहे. चव नसलेल्या पण शरीराला पोषक असणाऱ्या रानभाज्या उद्याची मोठी गरज असणार असल्याची भावना जिल्हा माहिती अधिकारी यवराज पाटील यांनी बोलून दाखविली.

या रानमहोत्सवा मागची संकल्पना "आत्मा" चे प्रकल्प उपसंचालक रवींद्र पाटील  यांनी विशद केली.

 प्रत्येक तालुक्यातील स्टॉल

प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांनी गावोगावच्या महिला शेतकरी गटानी रानपाले भाज्याचे स्टॉल टाकले असून यात आजकाल दुर्मिळ असलेली खडक शेपू, अंबाडी, करडई, तांदुळजा, कर्टूले, घोळ, कुरडू, तांदूळजा अशा विविध औषधी गुणधर्म असलेल्या भाज्याचे तसेच मध, ड्रॅगन फ्रुट, सोया पनीर, घाण्यावरचे शुद्ध तेल, सेंद्रिय थाळी, मसाले स्टॉल लावण्यात आले होते.                     

याप्रसंगी जवळपास तीन लाख  रुपयांची रेलचेल झाली. हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या कडे गेला असल्या कारणे याबाबतीत कृषी विभागात समाधान व्यक्त केले. शहरातील नागरिकांसोबतच आरोग्यावर अभ्यास करणारे  डॉक्टर मंडळी यांच्या समवेतच अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील, लेखा वित्त अधिकारी रत्नराज जवळगेकर, शेतकरी कंपनीचे प्रमुख मोहन भिसे, लालासाहेब देशमुख, विलास उफाडे, रमेश चिल्ले, अश्रूबा जाधव यांनीही भेट देऊन शेतकऱ्यांचे कौतुक केले.               

कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील आत्माचे सर्व तालुका तंत्र व्यवस्थापक, सहाय्यक तंत्र व्यवस्थापक यांनी परिश्रम घेतले.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु