लातूर जिल्ह्यात पाणी टंचाई उपाययोजनांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
*वृत्त क्र. : 432*
लातूर जिल्ह्यात पाणी टंचाई उपाययोजनांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
लातूर, दि. ३० : जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण भागामध्ये अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेली पाणी टंचाई लक्षात घेता, टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे आणि खाजगी विहीर किंवा विंधन विहीर अधिग्रहाच्या कालावधीस ३१ जुलै २०२६ पर्यंत किंवा पुरेसा पाऊस होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत मुदतवाढ देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी निर्गमित केले आहेत.
या आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी प्रत्यक्ष पाणी टंचाई निर्माण झालेल्या गावे व वाड्यांमध्ये स्थानिक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या नियमांनुसार नागरी व ग्रामीण भागाकरिता शेवटचा पर्याय म्हणून टँकरद्वारे पाणी पुरवठा मंजूर करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना आहेत, तर खाजगी विहीर किंवा विंधन विहीर अधिग्रहणास मान्यता देण्याचे अधिकार जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रापुरते प्रदान करण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून आवश्यकतेनुसार उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
***
Comments
Post a Comment