१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना 'एचएसआरपी' प्लेट बसवण्यासाठी ३० जूनपर्यंत अंतिम मुदत; अन्यथा १ जुलैपासून होणार दंडात्मक कारवाई
वृत्त क्र. : 431 दिनांक : 29 जून,2026
१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना 'एचएसआरपी' प्लेट बसवण्यासाठी
३० जूनपर्यंत अंतिम मुदत; अन्यथा १ जुलैपासून होणार दंडात्मक कारवाई
लातूर, दि. २९ : केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० नुसार सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी प्लेट बसवण्यासाठी आता ३० जून २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीनंतर, म्हणजेच १ जुलै २०२६ पासून नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे लातूर प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
ज्या वाहनधारकांनी आपल्या वाहनांना अद्याप एचएसआरपी प्लेट बसवलेली नाही, अशा वाहनांच्या विविध शासकीय कामांवर परिवहन विभागाने निर्बंध लादले आहेत. त्यानुसार वाहन हस्तांतरण, पत्ता बदल करणे, कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे, वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनात बदल करणे आणि परवाना नूतनीकरण यांसारखी सर्व महत्त्वाची कामे (योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण वगळून) आता पूर्णपणे थांबविण्यात येत आहेत. तसेच १ जुलै २०२६ पासून एचएसआरपी प्लेट नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १७७ नुसार थेट दंडात्मक कारवाई केली जाईल.
ज्या वाहनधारकांनी ३० जून २०२६ पर्यंत एचएसआरपी प्लेट बसवण्यासाठी ऑनलाइन किंवा आगाऊ नोंदणी केली आहे, अशा वाहनांना या कारवाईतून तात्पुरती सूट देण्यात येणार आहे. तरी १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या आपल्या वाहनांचे कोणतेही शासकीय काम अडकू नये आणि दंडात्मक कारवाई टाळता यावी, यासाठी अधिकृत फिटमेंट सेंटरकडून लवकरात लवकर एचएसआरपी प्लेट बसविण्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन लातूर प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
****
Comments
Post a Comment