‘महा वॉकेथॉन २०२६ - वॉक फॉर वॉटर’मध्ये लातूरकरांचा उत्स्फूर्त सहभाग !
‘महा वॉकेथॉन २०२६ - वॉक फॉर वॉटर’मध्ये लातूरकरांचा उत्स्फूर्त सहभाग !
• ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’चा जागर
• सहभागासाठी क्यूआर कोडद्वारे नोंदणी करणे आवश्यक
लातूर, दि. २१: मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने आज जलसंधारण दिनानिमित्त लातूर येथे ‘महा वॉकेथॉन - वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लातूर जिल्हा परिषद प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या वॉकेथॉनला सुरुवात झाली. ‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युर टुमारो’ ही या कार्यक्रमाची संकल्पना होती, तर ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हे घोषवाक्य होते.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिराजदार, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार आणि जिल्हा जलसंधारण अधिकारी जावेद पटेल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मृद व जलसंधारणाची शपथ देण्यात आली.
माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त या वर्षापासून २१ ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शाश्वत विकासासाठी मृद व जलसंधारणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी १५ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला होता. जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी आज या ‘महा वॉकेथॉन - वॉक फॉर वॉटर’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद प्रांगणापासून सुरू झालेली ही महा वॉकेथॉन नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चालत पार पडल्यानंतर तिचा समारोप झाला.
पाणी हेच जीवन आहे. लातूर जिल्ह्यात जलसंधारणाची कामे वेगाने होत असून पूर्वीपेक्षा परिस्थिती सुधारत आहे. सध्या एल निनोचे संकट असून भविष्यातही अशी संकटे येऊ शकतात. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत जिरवणे आणि भूजल पुनर्भरण करण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. पुढील पिढीसाठी आपण माती व पाणी जपले पाहिजे. यादृष्टीने जनजागृती करण्यासाठी आज महा वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे; तरी सर्वांनी पुढे येऊन मृद व जलसंधारणात आपला वाटा उचलावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले. तसेच, ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन वृक्ष लागवडीसाठी करत असलेल्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले.
जिल्हाधिकाऱ्यांनीही पूर्ण केली तीन किलोमीटरची वॉकेथॉन
लातूरमधील युवक-युवती, खेळाडू, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह सर्व वयोगटांतील नागरिकांनी या महा वॉकेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मृद व जलसंधारणासाठी राज्य शासनाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद दिला. सहभागींनी सुमारे तीन किलोमीटर पायी चालत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’चा संदेश दिला. जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनीही स्वतः सक्रिय सहभाग नोंदवत जिल्हा परिषद ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचे तीन किलोमीटरचे अंतर चालत पार केले.
वॉकेथॉनचा समारोप झाल्यानंतर बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनचे पथक विशेष लक्षवेधी ठरले, त्यांनी छत्रीच्या साहाय्याने विविध संदेश रेखाटत ‘सेव्ह वॉटर, सेव्ह सॉईल’चा प्रसार केला. महा वॉकेथॉनमध्ये जिल्हास्तरावर २५ हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्रभाकर शिवानंद परीट याने, १५ हजार रुपयांचे द्वितीय बक्षीस श्याम जगन्नाथ माने याने, तर १० हजार रुपयांचे तृतीय क्रमांकाचे बक्षीस शेख सरफराज गफार याने पटकावले. यासोबतच लकी ड्रॉ (ईश्वर चिठ्ठी) द्वारे ७ सहभाग्यांची निवड करून त्यांना प्रत्येकी ३ हजार रुपयांचे बक्षीस व सन्मानचिन्ह देण्यात आले.
***












Comments
Post a Comment