परदेश अभ्यास दौऱ्यासाठी २७ ऑगस्टला पात्र प्रस्तावांची सोडत
परदेश अभ्यास दौऱ्यासाठी २७ ऑगस्टला पात्र प्रस्तावांची सोडत
लातूर, दि. २१ (जिमाका) : लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यासाठी २०२६-२७ अंतर्गत प्राप्त पात्र प्रस्तावांची सोडत २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, लातूर यांच्या दालनात काढण्यात येणार आहे. प्रस्ताव सादर केलेल्या सर्व शेतकऱ्यांनी सोडतीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी केले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना प्रगत देशांतील आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कृषीमाल प्रक्रिया, निर्यात, पणन, बाजारपेठेतील मागणी तसेच अद्ययावत शेती पद्धतींची माहिती मिळावी, यासाठी कृषी विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. परदेशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद, क्षेत्रीय भेटी आणि संबंधित संस्थांना भेटी यांद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान व क्षमता वाढविणे हा या अभ्यास दौऱ्याचा उद्देश आहे.
लातूर जिल्ह्यासाठी ५ शेतकऱ्यांचे भौतिक उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. यामध्ये एक महिला शेतकरी, केंद्र व राज्य शासनाचे विविध कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी, पीक स्पर्धेतील विजेते तसेच इतर शेतकरी यांचा समावेश आहे. अभ्यास दौऱ्यासाठी युरोप आणि चीन या देशांची निवड करण्यात आली आहे. या अनुषंगाने तालुकास्तरावरून इच्छुक शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. प्राप्त प्रस्तावांमधून पात्र प्रस्तावांची सोडत काढण्यात येणार असल्याचेही श्री. जाधव म्हणाले.
****
Comments
Post a Comment