सशस्त्र दलातील अधिकारी पदासाठी पूर्व प्रशिक्षणाची संधी
सशस्त्र दलातील अधिकारी पदासाठी पूर्व प्रशिक्षणाची संधी
लातूर, दि. २१ (जिमाका) : भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) परीक्षेची पूर्वतयारी करून देण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी २१ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत एसएसबी कोर्स क्रमांक ६६ आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षण, निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
लातूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी २० सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लातूर येथे मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस येताना पुणे सैनिक कल्याण विभागाच्या (डिएसडब्ल्यु) यांच्या संकेतस्थळावरून एसएसबी -66 कोर्ससाठीचे प्रवेशपत्र तसेच त्यासोबतची परिशिष्टे डाउनलोड करून त्यांची प्रिंट घ्यावी. प्रवेशपत्र व परिशिष्टे पूर्ण भरून सोबत आणावीत.
एसएसबी प्रशिक्षण वर्गासाठी उमेदवाराकडे पुढीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे. CDSE-UPSC किंवा NDA-UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन एसएसबी मुलाखतीसाठी पात्र ठरलेले उमेदवार पात्र आहेत. तसेच NCC ‘C’ प्रमाणपत्र मिळविलेले, ‘A’ किंवा ‘B’ ग्रेडमध्ये उत्तीर्ण झालेले आणि NCC ग्रुप मुख्यालयाकडून एसएसबीसाठी शिफारस केलेले उमेदवारही पात्र आहेत. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीचे कॉल लेटर असलेले उमेदवार तसेच विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) अंतर्गत एसएसबी कॉल लेटर प्राप्त झालेले किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असलेले उमेदवारही या प्रशिक्षणासाठी पात्र आहेत. पात्रतेसंबंधी आवश्यक प्रमाणपत्रे प्रशिक्षण वर्गासाठी येताना सोबत आणावीत.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्याशी [training.pctcnashik@gmail.com](mailto:training.pctcnashik@gmail.com), दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ९१५६०७३३०६ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवतींनी भारतीय सशस्त्र दलात अधिकारी पदाची संधी मिळवावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल शरद प्रकाश पांढरे (नि.) यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment