दिवाळी २०२६ निमित्त लातूर जिल्ह्यात तात्पुरत्या फटाका विक्री परवान्यासाठी २८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
दिवाळी २०२६ निमित्त लातूर जिल्ह्यात तात्पुरत्या फटाका
विक्री परवान्यासाठी २८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, दि. २१ : दिवाळी २०२६ सणानिमित्त जिल्ह्यात तात्पुरत्या स्वरूपात फटाका विक्री दुकाने सुरू करण्यासाठी परवान्याकरिता २८ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
‘एक्सप्लोसिव्ह रूल्स २००८’ मधील नियम ८४ नुसार सुरक्षा अटींच्या अधीन राहून तात्पुरता परवाना देण्याचे अधिकार जिल्हादंडाधिकारी यांना असून यानुसार अर्जांची छाननी, स्थळ पाहणी आणि विविध परवानग्यांची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. अर्जदारांनी २८ सप्टेंबर २०२६ पर्यंत सेतू सुविधामधून प्राप्त विहित नमुन्यातील अर्ज, आधार कार्ड अथवा विजेचे बिल यांसारखा रहिवास पुरावा, स्थानिक स्वराज्य संस्थेचा नाहरकत दाखला, जागेच्या मालकीचा पुरावा किंवा भाडेपट्टा, तसेच जागा भाडेतत्त्वावर असल्यास जागामालकाचे संमतीपत्र, प्रस्तावित दुकानाच्या जागेचा नकाशा व लेआउट प्लॅन या आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावयाचे आहेत.
त्यानंतर १८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत तहसीलदार व पोलीस विभागाकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवाल सादर केला जाईल. या पाहणीदरम्यान प्रस्तावित जागा सुरक्षित असणे, शेड ज्वलनशील नसलेल्या साहित्याचे असणे, दोन शेडमध्ये किमान ३ मीटरचे तर सुरक्षित कामापासून ५० मीटरचे अंतर असणे, क्लस्टरमध्ये ५० पेक्षा अधिक दुकाने नसणे, शाळा, रुग्णालये, धार्मिक स्थळे, पेट्रोल पंप व दाट लोकवस्तीच्या ठिकाणांपासून सुरक्षित अंतर असणे, तसेच अग्निशमन व आपत्कालीन मार्ग उपलब्ध असणे या सर्व सुरक्षा निकषांची पडताळणी केली जाणार आहे.
१९ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कार्यालयीन छाननी व विहित परवाना शुल्क भरण्याची प्रक्रिया पार पडेल आणि पात्र ठरलेल्या अर्जदारांना २३ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२६ दरम्यान अंतिम तात्पुरता फटाका विक्री परवाना निर्गमित केला जाईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment