भरती परीक्षा सुधारणांसाठी अभिप्राय, सूचना जिल्हास्तरीय विशेष कक्षात १८ सप्टेंबरपर्यंत सादर करता येणार
लातूर, दि. १४ (जिमाका) : राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसेच गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे २१ सप्टेंबर २०२६ रोजी कामाच्या अनुषंगाने ही समिती भेट देणार आहे. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये आस्थापना शाखा येथे विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष १८ सप्टेंबर २०२६ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कामकाजासाठी खुला राहील. याठिकाणी नागरिक आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात प्रत्यक्ष सादर करू शकतात.
समितीच्या छत्रपती संभाजीनगर येथील भेटी दरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर येथे समिती संवाद साधणार आहे. तसेच ज्या नागरिकांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसेल, त्यांनी आपले लेखी अभिप्राय csn-examreformtaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठवू शकतात.या विभागनिहाय संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा टास्क फोर्सकडून अभ्यास करण्यात येणार आहे. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येणार आहेत.
*****
Comments
Post a Comment