पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी 15 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी

15 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

लातूर, दि. 3 (जिमाका) : राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या महिला व संस्थांना दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. सन 2020-21, 2021-22, 2022-23. 2023-24 या वर्षासाठी पुरस्कार देण्यात येणार असून यासाठी इच्छुक व्यक्ती, संस्थांनी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत आपले प्रस्ताव लातूर येथील प्रशासकीय इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डी. एम. गिरी यांनी केले आहे.

राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरूप एक लाख एक रुपये रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असून या पुरस्कारासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 25 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असलेल्या महिला या पुरस्कारासाठी पात्र आहेत. जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, दलितमीत्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई पुरस्कार प्राप्त झालेल्या महिलांना तो पुरस्कार मिळाल्याच्या पाच वर्षांपर्यंत या पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

विभागीय पुरस्काराचे स्वरूप पंचवीस हजार एक रुपये रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ आहे. महिला व बाल विकास क्षेत्रात किमान सात वर्षे कार्य असावे. नोंदणीकृत संस्थेस दलितमित्र पुरस्कार प्राप्त नसावा, संस्था राजकारणापासून अलिप्त असावी. तसेच तिचे कार्य व सेवाही पक्षातील राजकारणापासून अलिप्त असावी.

जिल्हास्तरीय पुरस्काराचे स्वरूप दहा हजार एक रुपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे. महिला व बाल विकास क्षेत्रात किमान दहा वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव आवश्यक आहे. दलितमित्र पुरस्कार किंवा सावित्रीबाई पुरस्कार मिळालेला महिलांना हा जिल्हास्तरीय पुरस्कार अनुज्ञेय राहणार नाही.

प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे

 राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करताना चारित्र्य चांगले असल्याचे, तसेच अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी तसेच त्यांनी सार्वजनिक संपत्तीचा अपहार केल्याबाबतचा गुन्हा दाखल नसल्याचे विभागीय पोलीस अधीक्षक यांचे प्रमाणपत्र, प्रस्तावधारकाची माहिती, केलेल्या कार्याचा तपशील वृत्तपत्र फोटोग्राफसह, सध्या कोणत्या पदावर कार्यरत आहे, यापूर्वी पुरस्कार मिळाला असल्यास त्याबाबतचा तपशील आदी कागदपत्रे सादर करावीत. पुरस्कारासाठी प्रस्ताव 3 प्रतीत सादर करावा.

विभागस्तरीय पुरस्कारासाठी संस्थेची माहिती व वृत्तपत्र फोटोग्राफसह कार्याचा अहवाल, सध्या कोणत्या पदावर कार्यरत आहे याबाबतची माहिती, यापूर्वी पुरस्कार मिळाला असल्यास तपशील, संस्था नोंदणी प्रमाणपत्र व घटनेची प्रत, संस्थेचे पदाधिकारी यांचे चारित्र्य चांगले असल्याचे, त्यांचेविरुध्द कोणताही फौजदारी तसेच त्यांनी सार्वजनिक संपत्‍तीचा अपहार केल्याबाबतचा गुन्हा दाखल नसल्याचे व संस्थेचे कार्य व संस्था राजकारणापासून अलिप्त असल्याचे विभागीय पोलीस अधिक्षक यांचे प्रमाणपत्र सादर करावे. पुरस्कारासाठी प्रस्ताव 3 प्रतीत सादर करावा.

इच्छुक व्यक्ती, संस्थांना विहित नमुन्यातील अर्जासाठी तसेच अधिक माहितीसाठी लातूर येथील प्रशसकीय इमारतीमधील पहिल्या मजलावरील जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात अथवा 02382-221206 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा 9503905277 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह आपला प्रस्ताव तीन प्रतीत 15 ऑगस्ट 2023 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, पहिला मजला, लातूर येथे सादर करावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. गिरी यांनी कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा