प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेविषयी

विभागस्तरीय कार्यशाळेत मार्गदर्शन  


लातूर, दि. 11 (जिमाका)
: आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत कृषि विभागामार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत जिल्हा नोडल अधिकारी, बॅंक अधिकारी, संलग्न विभागातील अधिकारी, माविम, जिल्हा संसाधन व्यक्ती आणि जिल्हास्तरीय प्रशिक्षण संस्था यांची एक दिवसीय विभागस्तरीय कार्यशाळा लातूर कृषि महाविद्यालय येथे आज झाली.


विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर, विभागीय अधिक्षक कृषि अधिकारी महेशकुमार तिर्थकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रक्षा शिंदे, विपणन व्यवस्थापक सत्यवान वराळे, एम आय एस व्यवस्थापक विलास बोभाटे, राज्य प्रकल्प व्यवस्थापक अमोल चिद्रावार, दिनेश राठोड, बँकिंग अलाइन्स सुनिल रामटेके, राज्यस्तरीय तांत्रिक संस्था प्रशिक्षण समन्वयक चंद्रकांत भोर, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य चव्हाण, प्रशिक्षक सुनिल शेटे, माविमचे जिल्हा व्यवस्थापक मन्सूर पटेल यावेळी उपस्थित होते.

हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यशाळेला प्रारंभ झाला. दूरदर्शी प्रणालीद्वारे नोडल अधिकारी तथा पुणे कृषि आयुक्तालय येथील संचालक सूभाष नागरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

विपणन व्यवस्थापक सत्यवान वराळे यांनी प्रास्ताविक करताना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतील प्रस्तावाबाबत सद्यस्थितीबाबत माहिती दिली.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांतर्गत जास्तीत जास्त लाभार्थी तयार करावेत. शेतकऱ्यांचे आर्थिक उन्नती साधण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी केले.

माहिती प्रणाली व्यवस्थापन पोर्टलवर अर्ज करणे ते मंजूर करणे पर्यंतची कार्यवाही, सामाईक पायाभूत सुविधा आणि मार्केटिंग व ब्रॅण्डिंग पात्रता, घटक व अर्ज पद्धती, वैयक्तिक व गट लाभार्थी अनूदान, बॅंक कर्ज मंजुरी कार्यपद्धती, सविस्तर प्रकल्प अहवाल, अधिकारी यांची क्षमता बांधणी याविषयी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेस लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा नोडल अधिकारी, कृषि उपसंचालक, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, बॅंक अधिकारी, विभागीय कृषि अधिकारी, संलग्न विभागातील अधिकारी, जिल्हा संसाधन अधिकारी, जिल्हास्तरीय प्रशिक्षण संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग व सोयाबीनवरील येलो मोझॅक रोग नियंत्रण बाबतीतील घडीपत्रिकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्हा संसाधन व्यक्ती यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन कृषि पर्यवेक्षक सूर्यकांत लोखंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्रीमती रक्षा शिंदे यांनी मानले.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा