निलंगा तालुक्यातील पाच कृषि निविष्ठा केंद्रांचे परवाने निलंबित
लातूर, दि. 7 (जिमाका) : निलंगा तालुक्यातील पाच कृषि निविष्ठा विक्री केंद्रांचे परवाने निलंबनाची कारवाई कृषि विभागाकडून करण्यात आली आहे. कृषि आयुक्तांच्या सूचनेनुसार लातूर जिल्ह्यातील भरारी पथकामार्फत कृषि निरीक्षकाकडून कृषि निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
कृषि निविष्ठा केंद्रात विक्री परवाना दर्शनी भागात न लावणे, साठा व भावफलक सहज दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित न करणे, साठा नोंदवही अद्यावत न ठेवणे, बिलावर शेतकऱ्यांची सही अथवा अंगठा न घेणे, विक्री बिलात बियाण्यांचा संपूर्ण तपशील न लिहिणे, दुकानात वजन काटा न ठेवणे, विक्रीस ठेवलेल्या बियाण्यांचे स्त्रोत न ठेवणे, विहित मुदतीत परवान्याचे नुतनीकरण करून न घेणे आदी त्रुटी भरारी पथकाच्या तपासणीमध्ये आढळून आल्या होत्या. या कृषि निविष्ठा विक्री केंद्रांवर करण्याचा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाला होता.
यापुढे साठा फलक व भावफलक प्रदर्शित न केल्यास, साठा नोंदवहीतील साठा व प्रत्यक्षात साठा यामध्ये तफावत आढळून आल्यास, तसेच बियाणे व खताचा भावफलक, साठा नोंदवही अद्यावत नसल्यास, बिलावर शेतकऱ्यांची सही अथवा अंगठा घेत नसल्यास, विक्री बिलात बियाण्यांचा संपूर्ण तपशील लिहित नसल्यास, दुकानात विक्रीस ठेवलेल्या उत्पादकाचा स्त्रोत समावेश करून न घेतल्यास, खताची अथवा बियाणाची लिंकिंग केल्यास विक्री केंद्राविरुद्ध खत नियंत्रण आदेश 1985, तसेच बियाणे नियंत्रण आदेश 1983, बियाणे नियम 1968 व अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 नुसार कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रक्षा शिंदे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment