सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून संवेदनशीलपणे आणि एकोप्याने काम करूया - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
·
महसूल सप्ताहाचे उत्साहात उद्घाटन
·
प्रशासनाची प्रतिमा उंचाविण्यासाठी संवादात्मक बना
·
कामाची गती वाढविण्यासाठी क्षमता बांधणी, सुविधांवर भर
देणार
·
‘माझं कार्यालय, सुंदर कार्यालय’ संकल्पना राबविण्याच्या
सूचना
·
प्रत्येक गावात स्मशानभूमी, घर तिथं वृक्ष,
जलव्यवस्थापनासाठी मोहीम राबविणार
लातूर, दि. 1 (जिमाका) : महसूल विभाग
हा प्रशासनातील सर्वात महत्वाचा विभाग आहे. त्यामुळे शासनाच्या सर्वाधिक
योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी ह्या विभागाकडे असून सर्वसामान्य जनतेच्या जीवनाला
स्पर्श करणारा हा विभाग आहे. त्यामुळे महसूल विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी
यांनी सर्वसामान्य नागरिक हा केंद्रबिंदू मानून संवेदनशीलपणे आणि संवादात्मक होवून
एकोप्याने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
महसूल दिनी लातूर येथील भक्ती शक्ती
मंगल कार्यालयात आयोजित महसूल सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमात जिल्हाधिकारी
श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक सोमय मुंडे
यांच्या हस्ते झाले. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी नमन गोयल, अपर जिल्हाधिकारी
सुनील यादव, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कृष्णा चावरे, निवासी उपजिल्हाधिकारी
विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, डॉ. सुचिता शिंदे, गणेश महाडिक, नितीन
वाघमारे, प्रियांका कांबळे, अहिल्या गाठाळ, उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, रोहिणी
नऱ्हे-विरोळे, प्रवीण फुलारी, प्रतीक्षा भुते, अविनाश कोरडे, सुशांत शिंदे, सर्व
तहसीलदार यावेळी उपस्थित होते.
‘संवादात्मक
आणि संवेदनशील प्रशासन’
निवडणूक ते नैसर्गिक आपत्ती या
प्रत्येक बाबतीत महसूल विभागाची प्रमुख भूमिका आहे. सर्वसामान्य जनतेला योजनांचा
लाभ मिळवून देण्यासोबतच त्यांच्या मनातील प्रशासनाची प्रतिमा उंचाविण्यासाठी अधिकारी,
कर्मचारी यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी कार्यालयात समस्या घेवून येणाऱ्या
नागरिकांशी सुसंवाद ठेवून, त्यांची तक्रार केवळ कागद म्हणून न वाचता ती तक्रार
मानवी दृष्टीकोन ठेवून समजून घेवून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावा.
‘संवादात्मक आणि संवेदनशील प्रशासन’ अशी प्रतिमा जनतेच्या मनात निर्माण करण्यासाठी
सर्वांनी प्रयत्न करावेत. प्रशासनाची जनतेच्या मनातील प्रतिमा उंचाविणे, हाच
आपल्यासाठी खरा पुरस्कार असेल, अशी भावना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी
व्यक्त केली.
गुणवत्तापूर्ण, गतिमान प्रशासनासाठी
प्रयत्न
जिल्ह्यात जलव्यवस्थापन, ‘गाव तिथं
स्मशानभूमी’ आणि ‘कुटुंब तिथं वृक्ष’ मोहीम राबविण्यात येणार आहे. यासोबतच शासनाच्या
विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन गतिमान,
गुणवत्तापूर्ण बनविण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रशासनाचा कणा असलेल्या महसूल
विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून गतिमान आणि संवेदनशील प्रशासनाची अपेक्षा
व्यक्त करताना त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांची क्षमता बांधणी
करण्यासाठी वैयक्तिक लक्ष देणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी
सांगितले.
‘माझे कार्यालय, सुंदर कार्यालय’
संकल्पना राबवा
महसूल सप्ताह कालावधीत सर्व
कार्यालयांमध्ये ‘माझे कार्यालय, सुंदर कार्यालय’ संकल्पना राबवून आपले कार्यालय
स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट बनविण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी प्रयत्न
करावेत, असे जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी सांगितले. तसेच महसूल कर्मचाऱ्यांच्या
आस्थापनाविषयक प्रश्नांचा आस्थापूर्वक विचार करून या प्रश्नाचा निपटारा केला जाईल.
महिला अधिकारी, कर्मचारी यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध
करून दिले जाईल, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या.
महसूल दिनासारखे उपक्रम सर्व
विभागांमध्ये व्हावेत-पोलीस अधीक्षक सोमय मुंडे
वर्षभर शासकीय कर्तव्य पार
पाडण्यासाठी राबणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याची
संधी महसूल दिनासारख्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळते. आपल्या विभागातील
कर्तव्यदक्ष अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक करणे, सर्वांना एकत्रित आणून त्यांची
कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महसूल दिनासारखे उपक्रम सर्वच
शासकीय विभागांमध्ये आयोजित केले जावेत, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय
मुंडे यांनी यावेळी केले.
महसूल विभागामार्फत आयोजित करण्यात आलेला
महसूल सप्ताह अतिशय चांगला उपक्रम आहे. यानिमित्त सात दिवस होणारे वेगवेगळे
कार्यक्रम कौतुकास्पद आहेत. महसूल विभाग हा प्रशासनातील महत्त्वाचा विभाग असून
सर्व शासकीय विभागांमध्ये प्रमुख समन्वयकाची भूमिका ठेवून शासकिय योजनांचा
अंमलबजावणी करण्याचे काम हा विभाग करतो. कायदा व सुव्यवस्थेमध्ये ह्या विभागाची
भूमिका महतत्वपूर्ण असल्याचे श्री. मुंडे यावेळी म्हणाले.
विविध योजनांच्या लाभार्थ्यांना
लाभाचे वितरण
जिल्ह्यात
महसूल सप्ताहाला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत विविध योजनांच्या लाभाचे वितरण
करण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत, संजय गांधी निराधार योजनेचे
मंजुरीपत्र, शिधापत्रिका, रहिवासी प्रमाणपत्र, नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या
नुकसानीच्या मदतीचे धनादेश, मतदार ओळखपत्र आदी बाबींचा यामध्ये समावेश होता. तसेच
तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांना स्थायित्व प्रमाणपत्राचेही यावेळी वितरण करण्यात
आले.
उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांचा
गौरव
गेल्या
वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा
महसूल दिनी सन्मान करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांचा
उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून तर उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुचिता शिंदे यांचा
निवडणूक कामकाजात उत्कृष्ट कामिगीरबद्दल सन्मान करण्यात आला. जळकोटच्या तहसीलदार
सुरेखा स्वामी, नायब तहसीलदार संवर्गातील कुलदीप देशमुख, सुरेश पाटील, संतोष
गुट्टे, धनेश दंताळे, रंगनाथ कराड यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यासोबतच
लघुलेखक, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, महसूल सहायक, तलाठी, वाहन चालक, शिपाई आणि
कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
महसूल सप्ताह अंतर्गत सात दिवस विविध
उपक्रम
महसूल विभागाकडून
देण्यात येणाऱ्या सेवा आणि राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांना व्हावी, यामध्ये
लाभधारकांचा सकारात्मक सहभाग वाढावा, यासाठी 1 ऑगस्टपासून ते
7 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आज महसूल दिनी महसूल
सप्ताहचे उद्घाटन झाले असून 2 ऑगस्ट रोजी युवा संवाद, 3
ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा, 4 ऑगस्ट रोजी जनसंवाद, 5
ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी, 6
ऑगस्ट रोजी महसूल विभागातील कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांशी
संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 7 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहाची सांगता होणार
आहे.
उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी,
नायब तहसीलदार श्री. वेरुळे, तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे भरत सूर्यवंशी,
महसूल कर्मचारी संघटनेचे माधव पांचाळ, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय
सूर्यवंशी, तलाठी-मंडळ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष महेश हिप्परगे, चतुर्थश्रेणी
कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमजान मुंडे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच
जिल्ह्याला विकासाच्या क्षेत्रात अग्रेसर ठेवण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आपली
जबाबदरी प्रामाणिकपणे पार पाडतील, अशी ग्वाही दिली.
दीपप्रज्वलन आणि लोकशाहीर साहित्यरत्न
अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.
निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी प्रास्ताविकात महसूल विभागाने गेल्या
वर्षात केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपविभागीय
अधिकारी शोभा जाधव, तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनी केले. उपविभागीय अधिकारी
सुशांत शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण
रोजगार हमी योजना, भूमि अभिलेख कार्यालयासह इतर शासकीय विभागाचे स्टॉल याठिकाणी
लावण्यात आले होते.
******
Comments
Post a Comment