·
लातूर
जिल्ह्यात 20 हजार हेक्टर क्षेत्रापर्यंत बांबू लागवड करता येणार
·
बांबू
आणि रेशीम शेती जिल्ह्याला आर्थिक विकासाकडे नेणारी
लातूर दि. 18 (जिमाका): बांबू शेती ही आर्थिकदृष्ट्या परवडणारी असून त्यासाठी लातूर
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे. शासनाने सातारा आणि लातूर या दोन
जिल्ह्यांचा बांबू लागवड मिशनमध्ये समावेश केला आहे. एक हेक्टर बांबू लागवड
करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून
(मनरेगा) तीन वर्षापर्यंत 7 लाख रुपये कुशल, अकुशल
मजुरीच्या रूपात दिले जाणार असल्याची माहिती मनरेगाचे राज्याचे महासंचालक नंदकुमार
यांनी येथे दिली.
दयानंद
महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित बांबू लागवड कार्यशाळेत श्री. नंदकुमार बोलत
होते. यावेळी माजी आमदार पाशा पटेल,
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी, एन. टी. पी. सीचे अधिकारी श्री. कदम, राजेंद्र
शहाळे, बांबू विषयाचे अभ्यासक संजीव करपे, वन विभागाचे सेवा निवृत्त अधिकारी आणि बांबू लागवड तज्ज्ञ सलीम
सय्यद, बांबू खरेदी व्यापारी संतोष राणे
उपस्थित होते.
आपण शेती करताना पाण्याचा वापर अतिशय जास्त प्रमाणात करतो.
त्यामुळे आपले एकरी उत्पादन अत्यल्प आहे. पिकाला योग्य ते पाणी देण्याचं नियोजन
केलं तर आपण मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊ शकतो. आता लातूर जिल्ह्यासाठी बांबू
लागवड मिशन अंतर्गत शासनाने शेतकऱ्यांना मोठी संधी निर्माण करून दिली आहे. तुमच्या
शेताची माती आणि त्यात येणारी बांबूची व्हरायटी याचा अभ्यास करून बांबू लावा. तुमच्या
सर्वांना एक प्रश्न पडला असेल,
बांबू लावू पण विकत कोण घेणार? त्याचे मार्केट कुठे आहे? त्याचे
उत्तर आहे, आता थर्मल पावरमध्ये वीज निर्माण
करण्यासाठी आपण दगडी कोळसा वापरतो त्यात 5 टक्के बांबू बायोमास वापरण्याचे केंद्र
सरकारने नियम केला आहे. ही टक्केवारी भविष्यात वाढणार आहे. त्यासाठी हजारो टन
बांबू लागणार आहे. त्याच बरोबर विविध प्रकारचे फर्निचर यापासून बनतात. त्यामुळे
बांबू विक्रीला हमखास गिऱ्हाईक मिळणार असल्याची माहिती नंदकुमार यांनी दिली.
लातूर जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी बांबू लागवड महत्वाची
ठरणार आहे. त्यासाठी याचे सूक्ष्म नियोजन करून अधिकाधिक क्षेत्र बांबू लागवडीखाली
आणून आपल्याला यातही लातूर पॅटर्न निर्माण करायचा आहे. त्यामुळे ग्रामस्तरापासून
ते जिल्हास्तरापर्यंतच्या प्रशासकीय यंत्रणांनी सक्रिय काम करायचे असून
शेतकऱ्यांना बांबू लागवड त्यासाठी मनरेगाकडून कुशल, अकुशल
मिळणारी आर्थिक मदत, रोपांची उपलब्धता, विक्रीला अजून तीन वर्ष आहेत. पण विक्री व्यवस्था पण सांगावी
त्यातून शेतकरी पुढे येतील. वातावरण बदल,
प्रदूषण यावर मात करायची असेल तर
बांबू लागवड हा उत्तम पर्याय आहे. गावांनी ठरवलं तर हे सहज शक्य असल्याचे सांगून
यामुळे लातूर जिल्ह्याचा ग्रीन बेल्टही वाढणार असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
यांनी यावेळी सांगितले.
आपल्याला पुढच्या पिढीला शुद्ध हवा आणि पाणी द्यायचं असेल तर
हवेतलं कार्बनच प्रमाण कमी करावं लागेल आणि मातीची धूप थांबवून जमिनीत पाणी मुरवावं
लागेल. त्यासाठी बांबू लागवड हा आर्थिकदृष्ट्या उत्तम पर्याय आहे. बांबू हे
गवतवर्गीय केल्यामुळे तुम्हाला लागवड आणि तोड करण्यासाठी कुठलेही बंधन नाही.
बांबूचा उपयोग इथेनॉल पासून ते थर्मल पॉवरचं इंधन म्हणून होत असल्यामुळे हे
बहुउद्देशीय पीक तुम्हाला अत्यंत फायदेशीर असल्याचे माजी आमदार पाशा पटेल यांनी
विविध उदाहरणासह पटवून दिले.
बांबू विक्री,
बांबू लागवड कशी करावी यासह थर्मल
पॉवरमध्ये इंधन म्हणून वापरताना बांबूची कॅलरीक क्षमता दगडी कोळशा एवढीच असल्याचे
या प्रशिक्षणामध्ये सांगण्यात आले. यावेळी गादवड, आलमला, किल्लारी,
वडजी, जेवरी
यासह बांबू लागवड करणाऱ्या दहा गावांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. वैयक्तिक
बांबू लागवड करणारे शेतकरी आर. बी. पाटील यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
बांबू लागवडीविषयी माजी आमदार पाशा पटेल यांनी लिहिलेल्या
पुस्तकाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमात सर्वांचा
सत्कार करताना बांबू पासून बनवलेल्या मुर्त्या, बांबूचे
रोप देवून करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.
Comments
Post a Comment