माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्यात ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रम राबविणार - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
महसूल सप्ताहानिमित्त आयोजित ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रमाला प्रतिसाद
·
माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे
प्राधान्य
·
रस्त्यांची समस्या प्राधान्याने सोडविणार; आरोग्यविषयक
सुविधा देणार
लातूर, दि. 5 (जिमाका) : देशाचे
संरक्षण करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावून सेवा करणाऱ्या सैनिकांच्या, माजी
सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. यासाठी प्रत्येक
महिन्याच्या पहिल्या मंगळवारी तालुका, उपविभाग आणि जिल्हास्तरावर ‘सैनिक हो
तुमच्यासाठी’ उपक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी
आज येथे जाहीर केले. महसूल सप्ताह अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘सैनिक हो
तुमच्यासाठी’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
महसूल सप्ताह अंतर्गत 1 ऑगस्ट ते 7
ऑगस्ट दरम्यान महसूल विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून जिल्ह्यातील
सर्व आजी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, शहीद जवानाच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व त्यांचे अवलंबित यांच्या अडीअडचणींचे निराकरण करण्यासाठी 5
ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात ‘सैनिक हो तुमच्यासाठी’
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, निवासी
उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) शरद पांढरे,
अखिल भारतीय माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन विलास सूर्यवंशी, जय जवान जय
किसान माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष शब्बीर दादू सय्यद यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी,
उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यावेळी उपस्थित होते.
महसूल सप्ताह अंतर्गत आयोजित ‘सैनिक
हो तुमच्यासाठी’ कार्यक्रमामुळे माजी सैनिक आणि जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये
सुसंवाद होण्यास मदत झाली असून हा संवाद यापुढेही कायम राहील. या कार्यक्रमाच्या
माध्यमातून प्राप्त झालेल्या माजी सैनिकांच्या समस्या, अडीअडचणी सोडविण्यासाठी
मिशन मोडवर प्रयत्न करून स्वतः या अनुषंगाने पाठपुरावा करणार असल्याचे
जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले. तसेच सर्व तहसील कार्यालये,
उपविभागीय कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी
सकाळी 11 ते 12 या कालावधीत माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेणे, त्या
सोडविण्यासाठी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा उपक्रम राबविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या.
माजी सैनिकांनी मांडलेले रस्तेविषयक
प्रश्न प्राधान्याने सोडविण्याबाबत कार्यवाही केली जाईल. आपण स्वतः सैनिकी शाळेत
शिक्षण घेतले असून सैनिकांचे, त्यांच्या कुटुंबाचा त्याग, त्यांना सहन करावा लागणार
त्रास याविषयी आपणास जाणीव असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यावेळी म्हणाल्या.
माजी सैनिकांना शिधापत्रिका देण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. माजी सैनिकांच्या पाल्यांना
विविध स्पर्धा परीक्षा, सैनिक भरतीबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात
येणार असून माजी सैनिकांना विविध आरोग्य सुविधा देण्यासाठीही नियोजन करण्यात येत
असल्याचे त्यांनी सांगितले.
वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता आणि
शौर्यपदकधारकांचा गौरव
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘सैनिक
हो तुमच्यासाठी’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते
जिल्ह्यातील वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता आणि शौर्यपदकधारकांचा गौरव करण्यात आला. यावेळी
जिल्हाधिकारी श्रीमती घुगे-ठाकूर यांनी स्टेजवरून खाली येत वीरमाता, वीरपत्नी,
तसेच वीरपिता यांचा त्यांच्या आसनाजवळ जावून सत्कार केला. त्यांच्याशी आपुलकीने संवाद
साधत समस्या जाणून घेतल्या, तसेच त्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याची ग्वाही
दिली. सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर शासनाच्या महसूल विभागात कार्यरत असलेल्या
माजी सैनिकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी यांना
धनादेश, दाखले वितरीत
‘सैनिक हो तुमच्यासाठी’ कार्यक्रमात जिल्ह्यातील
माजी सैनिकांना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचे धनादेश, प्रमाणपत्रे,
दाखले यांचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यामध्ये
पाल्याच्या शिक्षणसाठी शिष्यवृत्ती, वैद्यकीय आणि व्यावसायिक शिक्षणासाठी अर्थसहाय्य,
बस प्रवासासाठी मदत, शिधापत्रिका, सातबारा, आठ अ प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व
प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आदी बाबींचा समावेश होता.
माजी सैनिकांच्या समस्या जाणून
घेण्यासाठी पहिलाच उप्रकम
माजी सैनिकांना आमंत्रित करून त्यांचा
सन्मान करणे, तसेच त्यांच्या समस्या जाऊन घेण्यासाठी महसूल विभागाने आयोजित केलेला
‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा उपक्रम अतिशय समाधानकारक आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने
अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच होत असल्याबाबत अखिल भारतीय माजी सैनिक संघटनेचे
अध्यक्ष कॅप्टन विजय सूर्यवंशी यांनी राज्य शासन आणि प्रशासनाचे आभार मानले. संघटनेचे
औसा तालुका अध्यक्ष कॅप्टन कमलाकर सूर्यवंशी यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी त्यांनी माजी सैनिकांचे विविध प्रश्न मांडले.
प्रास्ताविकामध्ये जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी ले. कर्नल (नि.) श्री. पांढरे यांनी जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा
पत्नी, शहीद जवानाच्या वीरपत्नी, वीरमाता,
वीरपिता यांना देण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती दिली. तसेच कार्यक्रम
आयोजनाचा हेतू विशद केला. सूत्रसंचालन नीलकंठ जाधव यांनी केले, औसा-रेणापूरचे
उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे यांनी आभार मानले. लोकरंग कलामंचने कार्यक्रमाच्या
सुरवातीला विविध देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले.
******
Comments
Post a Comment