अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांचा होणार विशेष गौरव
अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक,
पत्नी, पाल्यांचा होणार विशेष गौरव
· दहा हजार रुपये, 25 हजार रुपयांचा पुरस्कार
लातूर, दि. 29 (जिमाका): जिल्ह्यातील अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, सैनिक पत्नी व पाल्यांचा विशेष गौरव पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. एकरकमी दहा हजार रुपये, 25 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) शरद पांढरे यांनी कळविले आहे.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, पुरस्कारप्राप्त यशस्वी उद्योजक, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, जळीत, दरोडा, अपघात अथवा इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे, तसेच देश, राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरूपाचे लक्षणीय काम करणाऱ्या व्यक्तींना विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
राष्ट्रीय स्तरासाठी एकरकमी दहा हजार रुपये आणि आंतरराष्ट्रीय स्तरासाठी 25 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच ज्या माजी सैनिक, सैनिक विधवांचे पाल्य इयत्ता दहावी व बारावी मंडळाच्या परीक्षेत 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे, त्यांनीही गौरव पुरस्कारसाठी 15 सप्टेंबर, 2023 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लातूर येथे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. पांढरे यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment