जिल्ह्यात लिंग निवडीस प्रतिबंध कायदा, तंबाखु नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
जिल्ह्यात लिंग निवडीस प्रतिबंध कायदा,
तंबाखु नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी करा
- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
लातूर, दि. 25 (जिमाका): जिल्ह्यात लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या भागात संशयित सोनोग्राफी केंद्रांची धडक तपासणी मोहीम राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी ‘पीसीपीएनडीटी’ समितीच्या बैठकीत दिल्या. यावेळी त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या विविध समित्यांचा आढावा घेतला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहाय्यक जिल्हाधिकारी नमन गोयल, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री जावेद शेख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. अशोक सारडा, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांच्यासह उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक बैठकीस उपस्थित होते.
जिल्ह्यात लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणीसोबतच जनजागृतीवर भर द्यावा. गर्भलिंग निदानाच्या अनुषंगाने सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी करावी, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यावेळी म्हणाल्या.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचाही आढावा घेतला. जिल्ह्यातील सर्व शासकिय कार्यालये, निमशासकिय कार्यालये व सर्व आरोग्य संस्था तंबाखूमुक्त ठेवण्याच्या सूचना दिल्या. सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाला आदेश दिले. जनतेसाठी आपत्कालीन वैद्यकिय सेवा अंतर्गत 108 रुग्णवाहिकेची सेवा रुग्णांना वेळेत सेवा उपलब्ध करून द्यावी. तसेच या रुग्णवाहिकेतील डॉक्टरांना बेस लोकेशनला ऑन ड्युटी हजर राहून सेवा देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या. राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय सर्व येथे रुग्णांना नियमीत दंत सेवा देण्यात याव्यात. रुग्णालयात आलेल्या रुग्णांची मौखिक तपासणी करून त्यांना आवश्यकतेनुसार औषधोपचार देण्यात याव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीचा आढावा
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती, एचआयव्ही, टीबी व ईएमटीसीटी समन्वय समितीची त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या कार्यालयामार्फत जिल्ह्यातील एचआयव्ही, एड्स कार्यक्रमाअंतर्गत विविध घटक निहाय उद्दिष्ट्यपूर्तीचा आढावा घेण्यात आला.
एड्स नियंत्रणासाठी माहिती शिक्षण व संपर्क माध्यमातून जनजागृती करणे, एचआयव्ही बाधीत व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवुन देणे, महायुवा संवाद अभियानातून युवा वर्गामध्ये एचआयव्ही, एड्सबाबत जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी दिल्या.
*****
Comments
Post a Comment