मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त शाळा, विद्यालयांमध्ये आजपासून व्याख्यानमाला
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त
शाळा, विद्यालयांमध्ये आजपासून व्याख्यानमाला
· जिल्हाधिकारी वर्षा-ठाकूर घुगे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
· जिल्ह्यातील विविध शाळा, विद्यालयांमध्ये होणार 75 व्याख्याने
· शिक्षण विभाग, जिल्हा माहिती कार्यालय व बाबासाहेब परांजपे फाउंडेशनचा उपक्रम
लातूर, दि. 10 (जिमाका) : मराठवाडा मुक्तिसंग्रामाची शौर्यगाथा पुढील पिढीला समजावी, यासाठी जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा माहिती कार्यालय व बाबासाहेब परांजपे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ‘शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. 11) जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात या व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे.
बाबासाहेब परांजपे फाउंडेशनचे सचिव तथा इतिहासकार भाऊसाहेब उमाटे हे व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, अमृत महोत्सव मितीचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव गोमारे, डी. एन. शेळके, मुख्याधापक एस. एम. वाघमारे यावेळी उपस्थित राहतील.
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवाच्या प्रारंभीही जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये व्याख्यानमाला आयोजित करून विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्याविषयी माहिती देण्यात आली होती. आता शाळा, विद्यालयातील विद्यार्थ्यांना या लढ्याची माहिती होण्यासाठी ‘शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 75 व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment