डोळयाच्या साथीबाबत घाबरु नका,नेत्रतज्ञांच्या सल्यानुसार योग्य ती काळजी घ्यावी - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

 डोळयाच्या साथीबाबत घाबरु नका,नेत्रतज्ञांच्या सल्यानुसार योग्य ती काळजी घ्यावी

- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे    

जिल्ह्यात डोळे येण्याची साथ सुरु; रुग्णांची संख्या 4 हजार 64 तर, पूर्णपणे बरे झालेले 2 हजार 514 


लातूर दि. 9 (जिमाका) : सद्यस्थितीत राज्यात डोळे येण्याची (Conjunctivitis) साथ सुरु असून लातूर जिल्हयात देखील या साथीचे आठ ऑगस्ट २०२३ अखेर एकूण ४ हजार ६४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २ हजार ५१४ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून उर्वरीत रुग्णांवर नेत्रतज्ञांच्या सल्ल्याने घरी उपचार सुरु आहेत. या साथीबाबत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी  आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून डोळयाच्या साथीबाबत नागरिकांनी घाबरून न जाता नेत्रतज्ञांच्या सल्यानुसार योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 

बैठकीस जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे, सहाय्यक जिल्हाधिकारी नमन गोयल, आरोग्य विभागाच्या लातूर मंडळाच्या उपसंचालक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप एम. ढेले , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. श्रीधर पाठक, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी बरुरे उपस्थित होते. 

डोळ्यांच्या साथीच्या बाबतीत नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे जाणवल्यास (डोळे लाल होणे, डोळयातून वारंवार पाणी गळणे, डोळयांमध्ये टोचल्यासारखे वाटणे, डोळ्यांमध्ये चिकट पाणी येणे (इ.) तात्काळ नेत्रतज्ञांचा सल्ला घेऊन उपचार सुरु करण्यात यावा.

डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह हे या साथ रोगाचे लक्षण आहे. हा आजार संसर्गजन्य असून एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीस होतो, संसर्ग वेगाने पसरतो त्यामुळे डोळयांच्या साथीची लागण झालेल्या रुग्णांनी घराच्या बाहेर न फिरता घरीच रहावे. डोळयांना गॉगल लावण्यात यावा, रुग्णांनी टॉवेल, रुमाल, साबण इ. वस्तू स्वतंत्र ठेवाव्यात त्या इतरांना वापरण्यास देऊ नयेत तसेच सदर रुग्णांनी जनसंपर्कात येऊ नये.

संसर्ग झालेल्या रुग्णांनी वारंवार डोळ्यांना हात लावू नये, इतर वस्तू व व्यक्ती यांना स्पर्श करू नये जेणेकरून संसर्ग पसरणार नाही. तसेच स्विमींग पुल मध्ये पोहण्यासाठी जाऊ नये, स्विमींग पुलाच्या माध्यमातून संसर्ग जास्त पसरण्याची शक्यता आहे. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्यास अशा विद्यार्थ्यांनी उपचारादरम्यान किमान ७ दिवस घरीच रहावे. नागरिकांनी सर्व  सुचनांचे पालन करण्यात यावे जेणेकरून जिल्हयात डोळयांची साथ पसरणार नाही असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

**

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा