क्रांती दिनानिमित्त विशेष लेख ‘चले जाव’ चळवळ आणि लातूर जिल्हा
क्रांती दिनानिमित्त विशेष लेख
‘चले जाव’ चळवळ आणि लातूर जिल्हा
भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा येत्या 15 ऑगस्ट 2023 रोजी समारोप होत आहे. यानिमित्ताने ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या संकल्पनेतून विविध उपक्रम ग्रामस्तर ते देशपातळीवर राबविले जात आहेत. मातीला नमन आणि वीरांना वंदन करण्यासाठी याबाविण्यात येणाऱ्या या उपक्रमांना 9 ऑगस्ट, क्रांतीदिनी प्रारंभ होत असून यानिमित्ताने लातूर जिल्ह्यातील काही ऐतिहासिक घटनांची स्मृती जागवणारा हा लेख...
भारतीय स्वातंत्र्य लढ्याला धार आली ती 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईत काँग्रेसच्या अखिल भारतीय अधिवेशनात भारत छोडो ठराव मंजूर झाला. 9 ऑगस्ट 1942 पासून ब्रिटिशांनो हिंदुस्थान सोडून जावा, यासाठी 'चलो जाव' चा नारा देऊन चळवळ सुरु झाली. 9 ऑगस्ट रोजी चळवळीस सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधींसह काँग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अटकेनंतर अरुणा असफ अली यांनी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे नेतृत्व केले. याचे पडसाद देशभर उमटले, हैद्राबाद संस्थानाचा भाग असलेल्या मराठवाड्यातही या आंदोलनाचे प्रतिध्वनी उमटले.
मराठवाड्यातील लातूर मध्ये 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनात राघवेंद्र दिवाण, मदनलाल जोशी, चंद्रशेखर बाजपेयी, शंकरराव अस्तुर, लक्ष्मणराव बिदरकर इत्यादी लातूर जिल्ह्यातील लोक सहभागी झाले होते. 18 सप्टेंबर 1942 रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमीर अलीखान यांनी निजाम सरकारकडे गुप्त अहवाल पाठविला होता. त्यात लातूर हायस्कूलमधील दोन विद्यार्थ्यांनी सत्याग्रह केल्याची माहिती असून मुख्याध्यापक श्री. अय्यर हे काँग्रेस विचारसरणीचा प्रसार करतात म्हणून त्यांची त्वरित बदली करण्यात यावी, असे अहवालात सुचविले होते.
लातूर जिल्ह्यातील राजकीय जागृतीसाठी डॉ. निलकंठराव कुलकर्णी, चंद्रशेखर बाजपेयी, राघवेंद्रराव दिवाण (जिल्हा संघटक, लातूर), बाबुराव कानडे, श्रीनिवासराव अहंकारी, शेषराव वाघमारे (निलंगा), निवृत्ती रेड्डी, माणिकराव पागे (अहमदपूर), देवीसिंग चौहान, व्यासाचार्य संधीकर (औसा), माधवराव धोणसीकर (उदगीर), किशनराव वकील, कालिदासराव देशपांडे, फुलचंद गांधी, दासराव बोकील, कॅप्टन व्यं. बा. जोशी (जिल्हा संघटक), नारायणराव चाकूरकर (औसा), विश्वंभरराव हराळकर इत्यादी असंख्य कार्यकर्त्यांनी कार्य केलेले आहे. सर्वांचा नामोल्लेख करणे शक्य नसले तरी त्यांचा या कार्यातील सहभाग मोलाचा होता.
लातूर येथे अनंत राजाराम जैन, गुरुसंग व काशिनाथ भोई यांनी रेल्वे व टेलिफोन व्यवस्थेच्या विरोधात मोडतोडीचे काम केले. त्यांना अटक होऊन दहा महिन्यांची शिक्षा झाली व इंदूरच्या तुरुंगात पाठविण्यात आले. पोलीस कारवाईनंतर त्यांची सुटका झाली. बाबासाहेब परांजपे, किसन सदाशिव यांच्या बरोबर अनंतराव गजमुखी, राघवेंद्रराव दिवाण (यांनी वकिली सोडून चळवळीत भाग घेतला), अब्दुल रझाक दिंडार, अब्दुल हमीद सारख्या अनेकांचा सत्याग्रहात सहभाग होता. या चळवळीमध्ये मराठवाड्यातील जवळपास 400 सत्याग्रहींना अटक झाल्याचे दिसते. यात जबाबदार राज्यपद्धतीला मान्यता देणे, राजबंदींना मुक्त करणे, हैद्राबाद स्वातंत्र्य करणे व येथून रेसिडेन्टला परत पाठवणे, नागरी स्वातंत्र्य देऊन हैद्राबाद स्टेट कॉंग्रेसची बंदी उठविणे यासारख्या मागण्या केल्या गेल्या.
उमरगा परिसरामध्ये 1942 च्या आंदोलनामध्ये अनेकांनी सहभाग घेतला. त्यात देवीसिंग चौहान, श्रीनिवास अहंकारी, शंभुगिरी महाराज यांचे कार्य उल्लेखनीय होते. याचा जनमनावर मोठा परिणाम झाला. औराद शहाजानी येथे प्रखर लढा देणारे लातूरचे देशबंधु, पं.वीरभद्र आर्य आडप्पा (देवदत्त) आणि व्यंकोबा माळवदकर या तिघांना सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा दिली गेली. अन्य सहकाऱ्यांना सुद्धा कमीअधिक दंड झाला.
निजामाच्या विरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून लातूरच्या टॉवरवर फडकत असलेला आसफअलीचा आसफजाही झेंडा काढून तेथे तिरंगा झेंडा फडकविण्यात आला. या कामी दाखवलेल्या साहसामध्ये शंकरराव अस्तुरे, विश्वनाथ आप्पा कापसे, रघुवीर शिंदे, मदनलाल जोशी, भीमराव वाबळे, श्यामराव किल्लारीकर यांचा सहभाग होता. पुढे त्यातील तिघांचा शोध घेऊन निजामांनी सक्तमजुरीची शिक्षा दिली गेली. ह्या लढ्याची प्रेरणा ‘चले जाव’ आंदोलनातून घेतल्यामुळे 9 ऑगस्टचा क्रांती दिन लातूर आणि मराठवाड्यासाठीही महत्वाचा ठरला. या ‘चले जाव’ चळवळीत ज्या-ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्य दाखविले त्यांच्या शौर्याला वंदन..!!
- युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, लातूर
***
Comments
Post a Comment