‘एक हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत निलंगा येथे दाखले, धनादेश वितरण

 




·         महसूल सप्ताहानिमित कार्यक्रमाचे आयोजन

·         नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन

लातूर, दि. 3 (जिमाका) : महसूल सप्ताहानिमित्त निलंगा तहसीलदार कार्यालयात ‘एक हात मदतीचा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी सुनील यादव यांच्या हस्ते झाले. नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचे धनादेश, सातबारा व आठ अ दाखल्याचे त्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

उपजिल्हाधिकारी संगीता टकले, उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, तहसीलदार श्रीमती उषाकिरण शृंगारे, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे डॉ. प्रमोद पाटील यावेळी उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्ती काळात शासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना, देण्यात येणारी मदत याविषयी अपर जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी माहिती दिली. तसेच स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे डॉ. पाटील यांनी ‘नैसर्गिक आपत्तीमध्ये आपली जबाबदारी’ या विषयावर मार्गदर्शन करताना पावसाळ्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, भूकंप आदी आपत्तीमधून स्वतःचा बचाव कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी श्रीमती जाधव यांनी केले. नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणती काळजी घ्यावी, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. तहसीलदार श्रीमती शृंगारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची मदत वितरीत

हाडोळी येथील हनुमान माने यांच्या दोन बैलांचा वीज पडून मृत्यू झाला होता. त्यामुळे श्री. माने यांना 64 हजार रुपयांचा मदतीचा धनादेश महसूल सप्ताहानिमित्त आयोजित ‘एक हात मदतीचा’ कार्यक्रमामध्ये सुपूर्द करण्यात आला. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी तळेगाव (बोरी) येथील शेतकरी सुनील दत्तात्रय सूर्यवंशी यांना प्रतिनिधीक स्वरुपात सातबारा व आठ अ वितरीत करण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांना विविध योजनांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे वितरण करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु