‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानाला लातूर जिल्ह्यात दिमाखात सुरुवात

 ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानाला लातूर जिल्ह्यात दिमाखात सुरुवात


अमृत वाटिकेसाठी मातीचे संकलन, कलशाची मिरवणूक

देशाला विकसित बनविण्यासाठी घेतली पंचप्रण प्रतिज्ञा

वीरांच्या स्मृती जागविण्यासाठी शीलाफलकांचे अनावरण

शालेय विद्यार्थी, नागरिकांनी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग


लातूर, दि. 9 (जिमाका) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव गेली वर्षभर सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. या महोत्सवाच्या सांगता समारंभानिमित्त 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  या अंतर्गत आजपासून जिल्ह्यात ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ अभियानाला दिमाखात सुरुवात झाली. जिल्ह्यातील सर्व 786 ग्रामपंचायातींसह नगरपालिका व नगरपंचायतींच्यावतीने गावातील माती कलशात एकत्र करण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शालेय विद्यार्थी, नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


गावागावांतील मातीचे संकलन; दिल्ली येथील अमृतवाटिकेसाठी माती पाठविणार


 ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत ‘मातीला नमन, वीरांना वंदन’ या संकल्पनेवर जिल्ह्यातील प्रत्येक गावातील माती दिल्ली येथे अमृत वाटिका, अमृत वन तयार करण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार आज जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये प्रतिकात्मक स्वरुपात एक लिटरच्या कलशामध्ये मातीचे संकलन करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थी, नागरिकांच्या उपस्थितीत या कलशासह प्रभात फेरी काढण्यात आली. सर्व गावातील कलश पंचायत समितीकडे जमा करण्यात येणार असून पंचायत समिती स्तरावर सर्व कलशातील माती एकत्रीत करुन प्रत्येक पंचायत समितीचा एक कलश जिल्हास्तरावर एकत्र करून दिल्लीला अमृत रोपवाटीका तयार करण्यासाठी पाठविण्यात येणार आहे.


शीलाफलकाचे ग्रामपंचायतींमध्ये अनावरण


सर्व ग्रामपंचायतीमध्ये केंद्र शासनाच्या विहीत मापदंडानुसार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिलाफलकाची निर्मिती करण्यात आली असून या शीलाफलकांचे अनावरण आज झाले. शूरवीरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या या शीलाफलकावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे बोधचिन्ह, प्रधानमंत्री नरेंद्र मोडी यांचा व्हिजन 2047 संदेश, स्थानिक शहीद वीराची नावे, ग्रामपंचायतीचे नाव, दिनांक याविषयीची माहिती नमूद करण्यात आली आहे.


गावपातळीवर अमृत रोपवाटिकेची निर्मिती


‘मातीला नमन’ करण्यासाठी जिल्ह्यातील 786 ग्रामपंचायतींमध्ये अमृत वाटिका तयार करण्यात येत आहेत. याची सुरुवातही आज करण्यात आली. या रोपवाटिकेसाठी गावातील योग्य जागा निवडून 75 देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी वृक्ष लागवड मोहीम सुरु केली आहे.


देशाच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी घेतली पंचप्रण शपथ


 ‘भारताला विकसित देश बनवायचे आहे. तसेच 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचं स्वप्न साकार करायचं आहे. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायची आहे. देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगायचा आहे. एकता आणि एकजुटता यासाठी कर्तव्यदक्ष राहायचं आहे. नागरिकांचे कर्तव्य बजावयाचे आहे. तसेच देशाचे रक्षण करणाऱ्यांचा आदर ठेवायचा आहे’, ही पंचप्रण शपथ आज सर्व ग्रामपंचायती, शासकीय कार्यालयांमध्ये घेण्यात आली. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक वृंद, ग्रामपंचायत स्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदविला.

***













Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा