लातूर जिल्हा बर्ड फ्लू रोग मुक्त*

 

*लातूर जिल्हा बर्ड फ्लू रोग मुक्त*

 

लातूर,दि.6 (जिमाका):- माहे जानेवारी 2021 मध्ये लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, रेणापुर, उदगीर व औसा या तालुक्यातील कांही गावातील कुकुट पक्षांमध्ये बर्ड फ्लू रोगाचा उद्रेक आढळून आला होता. सदरील रोग हा मानवात संक्रमित होणारा रोग असल्याने केंद्र शासन व राज्य शासन यांच्या मार्गदर्शक निर्देशानुसार पशुसंवर्धन विभागाने वेळीच दक्षता घेऊन रोग नियंत्रण केले होते.

 या रोगा संबंधी मागील सहा महिन्यापासून  रोग संनिरीक्षण काम पशुसंवर्धन विभाग लातूर यांच्याकडून केले जात असून या भागातील पक्षांचे प्रयोगशाळा नमुने राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था भोपाल (मध्यप्रदेश) येथे सातत्याने तपासणी केली जात होती. लातूर जिल्हा सद्यस्थितीत बर्ड फ्ल्यू रोगमुक्त झाला आहे. बर्ड फ्लू हा एव्हीएन इन्फ्लुएंझा या विषाणूमुळे होणारा रोग आहे. हा रोग मुळत: पक्षांमध्ये होणारा रोग असून  मानवामध्येही याचा संसर्ग होऊ शकतो. माणसांमधील संक्रमणाची पहिली नोंदही 1997 साली हाँगकाँग या देशांमध्ये झाली होती. वारंवार या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखूनदेखील स्थलांतर करणाऱ्या पक्षांमुळे याचा प्रसार होतो. संक्रमित पक्षाच्या लाळ, नाकातील स्त्राव आणि विष्ठा याद्वारे विषाणू वातावरणात पसरतात. त्यामुळे जेंव्हा निरोगी पक्षी संक्रमित पक्षांच्या किंवा त्यांच्या विष्टेच्या तसेच नाकातील स्त्रावाच्या संपर्कामध्ये आल्यानंतर त्यांना या रोगाची बाधा होते. या आजाराने संक्रमित झालेल्या पक्षामध्ये श्वसनास त्रास होणे, विस्कटलेले पंख, डोके आणि तोंडाचा भाग सुजलेला, चालताना तोल जाणे, मांडीवर रक्तस्राव मरतुकीचे प्रमाण वाढणे, अंडे देणाऱ्या पक्षांमध्ये अंड्याचे उत्पादन घटून त्यावरील कवच मऊ होतो इत्यादी लक्षणे दिसतात.

लातूर जिल्ह्यातील एकूण पक्षांची संख्या 6 लाख 58 हजार 879 इतकी आहे. लातूर  जिल्ह्यातही जानेवारी, 2021 मध्ये अहमदपूर, उदगीर, औसा, रेणापुर इत्यादी तालुक्यामधील कांही भागांमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाला होता. याला नियंत्रणात आणण्यासाठी लातूर पशुसंवर्धन विभागातर्फे शीघ्र कृती दलाची स्थापना करून सदरील साथ आटोक्यात आणण्यात आली. लातूर जिल्ह्यातील रोप व प्रादुर्भावग्रस्त केंद्रेवाडी, सुकनी, खुर्दवाडी वंजारवाडी (तोंडार), दवणगाव, आजादनगर भागातील एकूण 13 हजार 993 बाधित पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. तसेच नुकसानग्रस्त कुकुटपालक व्यवसायिकांना नुकसान भरपाई देण्यात आली. संसर्गजन्य भागातील सर्व बाधित पक्ष्यांची व अंड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.  तसेच त्या भागातील पक्षी गृहाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. रोगाचा केंद्रबिंदू असलेला भाग प्रतिबंधित करण्यात आले. व त्या भागांमध्ये पक्षांची विक्री व वाहतुकीस साथ आटोक्यात येईपर्यंत बंदी घालण्यात आली  होती.  सर्वसामान्य लोकांमध्ये व कुकुट पालकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, म्हणून त्यांना  या रोगाची शास्त्रोक्त माहिती देण्यात आली. हा रोग नियंत्रण व अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यासाठी बर्ड फ्यू कंट्रोल रूम , वार रूम स्थापन करण्यात आली. त्या बर्ड फ्लू कंट्रोल रूमचे नोडल ऑफिसर डॉ. अमर सोमवंशी यांनी उत्कृष्ट कामकाज केले. या रोगाला लातूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी लातूर सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. सरवदे व्ही. बी. आणि जिल्हा परिषदेचे  जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पडीले राजकुमार यांनी मोलाची कामगिरी बजावली.

 भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये अन्न चांगले शिजवून खाण्याच्या पद्धतीमुळे या रोगाचा प्रसार मनुष्यामध्ये कमी दिसून येतो. त्यामुळे मांस, अंडी चांगले शिजवून खाण्यास काहीच हरकत नाही. पक्ष्यांमध्ये असाधारण मर्तुक आढळल्यास त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशु सर्व चिकित्सालय सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन सरवदे व्ही. बी. लातूर यांनी केले आहे .

0000

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु