राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2023-24 अंतर्गत विविध बाबींसाठी 25 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2023-24 अंतर्गत
विविध बाबींसाठी 25 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, दि. 12 (जिमाका): राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2023-24 अंतर्गत अन्नधान्य पिके फ्लेक्झी घटकांतर्गत गोदाम बांधकाम, शेतकरी उत्पादक संघ कंपनी बीज प्रक्रिया संच, शेतकरी गटासाठी बीज प्रक्रिया ड्रम यंत्र आणि अन्नधान्य साठवणुकीसाठी कोठी कणगी आदी बाबींसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या सर्व बाबींसाठी शेतकरी उत्पादक संघ, कंपनी, एफपीओ, एफपीसी व वैयक्तिक शेतकरी यांनी बाबींसाठी तालुकास्तरावर ऑफलाईन पध्दतीने 25 सप्टेंबर, 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. व्ही. लाडके यांनी केले आहे.
गोदाम बांधकाम या बाबी अंतर्गत अन्नधान्य साठवणुकीसाठी 250 मे.टन क्षमतेच्या गोदाम बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12 लाख 50 हजार रुपये यापैकी जे कमी असेल, त्याप्रमाणे अनुदान दिले जाईल. ही बाब बँक कर्जाशी निगडित असून इच्छुक अर्जावर (शेतकरी उत्पादक संघ, कंपनी, एफपीओ, एफपीसी) केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना तथा नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकेकडे प्रकल्प सादर करणे आवश्यक आहे.
शेतकरी उत्पादक संघ कंपनी बीज प्रक्रिया संच या बाबीमध्ये उत्पादित बियाणावर प्रक्रिया करून दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शेतकरी उत्पादक संघ अथवा कंपनीला बीज प्रक्रिया प्रकल्प उभारणी करण्यासाठी (यंत्रसामुग्री व बांधकामासाठी) प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 10 लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे. तसेच शेतकरी गटासाठी बीज प्रक्रिया ड्रम यंत्र या बाबीमध्ये बियाण्यास मोठ्या प्रमाणावर बीजप्रक्रिया करण्यासाठी शेतकरी गटामार्फत बीज प्रक्रिया ड्रम यंत्र खरेदीसाठी 8 हजार रुपये प्रति युनिट किंवा किंमतीच्या 50 टक्के अनुदान अनुज्ञेय आहे.
अन्नधान्य साठवणुकीसाठी कोठी (कणगी) या बाबी अंतर्गत अन्नधान्य साठवणूक करण्यासाठी वैयक्तिक लाभार्थ्यास 5 क्विंटल मर्यादित कोठीसाठी (कणगी) किमतीच्या 50 टक्के किंवा 2 हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
******
Comments
Post a Comment