जळकोट, अहमदपूर येथील शासकीय वसतिगृहे आणि

लामजना येथील निवासी शाळेच्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

राज्य शासन सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी कटिबध्द

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

·        सर्वसुविधायुक्त दोन वसतिगृहे, निवासी शाळा इमारतीसाठी 29.86 कोटी खर्च


लातूर
, दि. 16 (जिमाका) : राज्य शासन गोरगरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असून विद्यार्थ्यांनी शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सामाजिक न्याय विभागाकडून लातूर जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या जळकोट आणि अहमदपूर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या, तसेच लामजना येथील शासकीय निवासी शाळेच्या इमारतींच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या लोकार्पणप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.


 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्यासह लातूरचे खा. सुधाकर शृंगारे, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. रमेश कराड, आ. अमित विलासराव देशमुख, आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. बाबासाहेब पाटील, आ. धीरज विलासराव देशमुख, आ. अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होत्या.


लातूर जिल्ह्यातील मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या दोन इमारती आणि शासकीय निवासी शाळेची एक इमारत या कामांसाठी इमारतीसाठी एकूण 29 कोटी 86 लक्ष रुपये निधी आणि 2 हेक्टर 20 आर जमीन उपलब्ध करून देण्यात आली. या दोन वसतीगृहांमुळे 200 विद्यार्थीनींची निवास व भोजनाची व्यवस्था झालेली आहे. तसेच निवासी शाळेमुळे 200 मुलांची शिक्षणाची व निवासाची व्यवस्था झालेली आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना भोजन, निवास, गणवेश, क्रीडा साहित्य, ग्रंथालय आणि संगणक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.


सामाजिक न्याय विभाग राबवित असलेल्या विविध योजनांची मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी माहिती दिली. शासकीय तसेच अनुदानित वसतिगृहांच्या माध्यमातून एकूण दीड लाख विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व सामाजिक न्याय विभागासाठी करण्यात येत असलेली तरतुदीची माहिती दिली.  तसेच मागासवर्गीय घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत विभागाचे सचिव सुमंत भांगे व विभागाच्या अधिकाऱ्यांचे  अभिनंदन केले.

अशा आहेत लोकार्पण झालेल्या इमारती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या जळकोट येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या इमारतीसाठी 60 आर जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच बांधकामासाठी 10 कोटी 81 लक्ष रुपये निधी देण्यात आला होता. 100 विद्यार्थी संख्येच्या या वसतिगृहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त मान्यता देण्यात आली होती. तसेच अहमदपूर येथील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या बांधकामासाठी शासनाने 8 कोटी 50 लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला होता. या वसतिगृहाची विद्यार्थी क्षमताही शंभर विद्यार्थ्यांची आहे. औसा तालुक्यातील लामजना येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या निवासी शाळेसाठी 100 आर जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच या शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी 10 कोटी 55 लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. 200 विद्यार्थी क्षमता असलेल्या या निवासी शाळेच्या इमारतीचेही आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

शैक्षणिक केंद्र असलेल्या लातूर जिल्ह्यात सर्वाधिक निवासी वसतिगृहे

लातूर जिल्हा हे शैक्षणिक केंद्र असल्याने जिल्ह्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्यातील सर्वाधिक 25 वसतिगृहे कार्यरत आहेत. यामध्ये मुलांची 13 आणि मुलींच्या 12 वसतिगृहांचा समावेश आहे. यामध्ये 2 हजार 790 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. तसेच जिल्ह्यात सहा निवासी शाळा कार्यरत असून यामध्ये 1 हजार 200 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो.

******

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा