शेततळ्यातून साधली समृद्धी..!
विशेष लेख
शेततळ्यातून साधली समृद्धी..!
औसा तालुक्यातील नांदुर्गा येथे महेश रामचंद्र पाटील यांच्या मालकीची भारी स्वरूपाची एकूण आठ एकर जमीन आहे. ही जमीन सारणी या गावाच्या बाजूला नांदुर्गा शिवारामध्ये येते. सुरुवातीला त्यांच्याकडे असणाऱ्या एकूण आठ एकर क्षेत्रामध्ये संपूर्णपणे कोरडवाहू पिके घेतली जात होती. यापासून त्यांना जेमतेम उत्पन्न मिळायचे. त्यामुळे शेती मधला खर्च परवडत नव्हता. अनियमित पर्जन्यमान व पिकाला संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था त्यांच्याकडे नसल्याने उत्पादनामध्ये घट येत होती. यातच त्यांना 2022 मध्ये राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत शेततळ्याच्या योजनेची माहिती मिळाली.
नांदुर्गा हे गाव मंडळ कृषी अधिकारी किल्लारी अधिनस्त येत असल्याने मंडळ कृषि अधिकारी तथा कृषी पर्यवेक्षक आर. डी. रेवशेट्टी व गावचे कृषि सहाय्यक एम.जी. वाघमारे यांनी शेततळ्याची योजना महेश पाटील यांना समजावून सांगितले. तसेच या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करून त्यांच्या शेताची पाहणी केली. पीक परिस्थिती बदलून उत्पादनामध्ये वाढ कशा पद्धतीने करता येते, तसेच पिकाचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करून पाणी व्यवस्थापनाच्या माध्यमातून संपूर्ण शेती बागायती खाली कशी आणता येईल, याबद्दल त्यांना माहिती दिली. त्यांच्या एकूण क्षेत्रांमध्ये पूर्वी वर्षाकाठी दोन ते सव्वादोन लाख रुपयेपर्यंत उत्पन्न मिळत होते.
नांदुर्गा हे गाव नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प म्हणजे पोखरामध्ये असल्याने श्री. पाटील यांच्या कागदपत्रांची संपूर्ण छाननी करून त्यांना शेततळ्याचा लाभ मंजूर करण्यात आला. त्यांना अस्तरीकरणासह 25 बाय 30 मीटरचे शेततळे दिले गेले. यासाठी त्यांना सुमारे 1 लाख 12 हजार रुपये अनुदान देण्यात आले. त्यांनी शेततळ्याच्या भोवताली कुंपण करून अस्तरीकरण केले व त्यामध्ये त्यांनी पाणी भरून घेतल. चार एकर क्षेत्रावर त्यांनी कोथिंबीर सुरुवातीला घेतली व या कोथिंबीरीचे त्यांना साधारणपणे 40 ते 45 दिवसांमध्ये सव्वा दोन लाख रुपये मिळाले. त्यानंतर सोयाबीन, हरभरा इत्यादी पिके त्यांनी स्प्रिंकलरच्या माध्यमातून शेततळ्यामध्ये असणाऱ्या पाण्याद्वारे जगविली त्यातूनही त्यांना वर्षाकाठी साधारणतः चार लाखाच्या आसपास उत्पन्न मिळाले. काही प्रमाणात उसाचेही त्यांनी उत्पादन घेतले.
शेततळ्यामुळे त्यांच्या शेतीला संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण झाली. मुबलक पाणी उपलब्ध असताना श्री. पाटील हे संपूर्ण शेततळे भरून घेतात व संपूर्ण हंगामामध्ये बारमाही पिके जगवतात. सध्या त्यांच्या शेतात पेरूची लागवड करण्यात आली आहे. चार एकर क्षेत्रामध्ये अतिघन पद्धतीने ही लागवड केलेली आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ त्यांनी घेतला आहे. त्यांना यावर्षीपासून एकूण साडेतीन लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. तसेच चार एकर क्षेत्राच्या पेरू मधून साधारणतः वर्षाकाठी सहा ते सात लाख रुपये उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे. या संपूर्ण बागेला त्यांनी ठिबक सिंचनाद्वारे सिंचनाची सुविधा केली आहे.
शेततळ्यामुळे संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने महेश रामचंद्र पाटील यांना आर्थिक दृष्ट्या समृद्ध होण्याचा मार्ग गवसला आहेच, पण सोबत शेतीमध्ये विविध प्रयोग करण्यासाठी आधार मिळाल्याचे त्यांच्याशी बोलताना जाणवते.
- जिल्हा माहिती कार्यालय, लातूर
******
Comments
Post a Comment