दिव्यांग बांधवांना योजनांचा लाभ देण्यावर भर

- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

·        मराठवाडा मुक्तिसंग्राम अृमत महोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय कार्यशाळा


लातूर
, दि. 13 (जिमाका): दिव्यांगांच्या शासकीय योजनांचा जिल्हाभरात जागर व्हावा. पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ वेळेवर मिळावा, यावर जिल्हा प्रशासनाचा अधिकाधिक भर असल्याची माहिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, समाज कल्याण विभागाच्यावतीने दिव्यांगांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या केंद्रीय सल्लागार मंडळाचे सदस्य सुरेश पाटील, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, निवडणूक उपजिल्हाधिकारी सुचिता शिंदे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, व्ही.के. गाडेकर, सतीश भापकर आदींची कार्यशाळेस उपस्थिती होती.


जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे म्हणाल्या, शिक्षक प्रत्येकाच्या जीवनाला आकार देतात. परंतु दिव्यांगांना शिक्षित करणारे शिक्षक यांचा मला विशेष अभिमान वाटतो. दिव्यांगांमध्ये असलेली कला, सुप्त गुणांची पारख करून त्यांना घडविण्याचे, त्यांना आर्थिक सक्षम करण्याचे काम या जिल्ह्यातील शिक्षक करत आहेत, याचे खूप समाधान आहे. कार्यशाळेच्या परिसरात दिव्यांगांनी उभारलेले विविध गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल्स, रेखाटलेली चित्रे, रांगोळी यातून दिव्यांगांमधील कलेचे, शक्तीचे दर्शन होते, असेही त्या म्हणाल्या. त्याचबरोबर दिव्यांगांची मतदार म्हणूनही देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका आहे. म्हणून पात्र दिव्यांगांनी मतदार यादीत आवर्जून नावाची नोंदणी करावी, असे आवाहन श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले.


कार्यशाळेत पात्र लाभार्थ्यांना आवश्यक साहित्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर राष्ट्रीय न्यास अधिनियमांतर्गत विविध योजनांवर श्री. पाटील, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम यावर श्री. भापकर, नेत्र व दंत चिकित्सा मोबाईल व्हॅन व रेटिनोपॅथी यावर डॉ. गौरी कुलकर्णी, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयटीआय प्रवेशायाबाबत श्री. गाडेकर, राजाभाऊ चौगुले यांनी देखील कार्यशाळेत मार्गदर्शन केले. श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरूवात झाली. सूत्रसंचालन सिंधु इंगळे-काटे यांनी केले.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा