‘स्पोर्ट्स कार्निवल’मध्ये चिमुकल्यांच्या मल्लखांब प्रात्यक्षिकांनी जिंकली मने !

 









मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत वर्षानिमित्त आयोजित

‘स्पोर्ट्स कार्निवल’मध्ये विविध क्रीडा प्रकारांची प्रात्याक्षिके, मार्गदर्शन

·        खेळाचे प्रकार आणि तंत्राविषयी प्रशिक्षकांनी केले मागर्दर्शन

लातूर, दि. 13 (जिमाका):  मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे आज ‘स्पोर्ट्स कार्निवल 2023’ अर्थात क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. एकाच छताखाली विविध क्रीडा प्रकारांची माहिती मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. अपर जिल्हाधिकारी सुनील यादव यांच्या हस्ते कार्निवलचे उद्घाटन झाले. यावेळी विविध क्रीडा प्रकारांची प्रात्याक्षिके दाखविण्यात आली. यामध्ये चिमुकल्यांनी सादर केलेल्या मल्लखांब प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली.

सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रशिक्षक दत्ता गलाले, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, प्रभारी तहसीलदार गणेश सरोदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खेळाला महत्व द्या : अपर जिल्हाधिकारी

आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी, शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने एका तरी क्रीडा प्रकाराचे कौशल्य आत्मसात करून त्यामध्ये सहभागी झाले पाहिजे. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीसोबतच मानसिक संतुलनही चांगले राहण्यास मदत होते. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी जीवनात खेळाला महत्व द्यायला हवे, असे अपर जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी यावेळी सांगितले. तसेच शालेय जीवनात फुटबॉल, बास्केटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करताना आलेले अनुभव त्यांनी यावेळी सांगितले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. एकाच छताखाली विविध खेळांची ओळख व्हावी, यासाठी आयोजित करण्यात आलेला ‘स्पोर्ट्स कार्निवल’ अतिशय उपयुक्त आहे. यामाध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास अपर जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी व्यक्त केला.

खेळामध्येही लातूरचे नाव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकावे : उपजिल्हाधिकारी श्री. महाडिक

लातूरला शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाते. या शहरात शिक्षण घेवून अनेकजण डॉक्टर, इंजिनीअर बनले आहेत. क्रीडा क्षेत्रातही काही खेळाडूंनी लातूरचे नाव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले आहे. यापुढेही विविध क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करणारे आणि लातूरचे नाव क्रीडा क्षेत्रातही उचाविणारे खेळाडू घडावेत, असे प्रतिपादन सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी केले.

स्पोर्ट्स कार्निवलमध्ये खेळाचे प्रकार, तंत्राविषयी मार्गदर्शन : जगन्नाथ  लकडे

स्पोर्ट्स कार्निवलच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या खेळांची माहिती, त्या खेळाचे तंत्र याविषयीचे मार्गदर्शन एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले आहे. संबंधित क्रीडा प्रकारातील तज्ज्ञ प्रशिक्षक, क्रीडा संघटनेचे प्रतिनिधी या खेळाविषयी माहिती देतील. तसेच त्या खेळाचे प्रात्यक्षिकही याठिकाणी दाखविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी जंगन्नाथ लकडे यांनी यावेळी दिली.

चिमुकल्यांच्या मल्लखांब प्रात्यक्षिकाने जिंकली उपस्थितांची मने !

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लातूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित ‘स्पोर्ट्स कार्निवल 2023’मध्ये विविध क्रीडा प्रकारांची माहिती, मार्गदर्शनासोबतच प्रात्यक्षिकांचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी लक्ष ओमप्रकाश उच्चे आणि विहान रामलिंग बिडवे आठ ते नऊ वर्षांच्या बालकांनी मल्लखांब क्रीडा प्रकाराचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले. मल्लखांबावर त्यांनी केलेल्या कसरतींना उपस्थित विद्यार्थी, खेळाडू यांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाच्या संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या विठ्ठल हणमंत माळी यानेही यावेळी मल्लखांब प्रात्यक्षिक सादर केले. बॉक्सिंग, तलवारबाजी, धनुर्विद्या, मार्शल आर्टसह विविध क्रीडा प्रकारांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले.

क्रीडा प्रकारांची माहिती देण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडिंटन हॉल येथे विविध क्रीडा संघटनांचे स्टॉल उभारण्यात आले होते. कार्निवलच्या उद्घाटनानंतर अपर जिल्हाधिकारी श्री. यादव, उपजिल्हाधिकारी श्री. महाडिक यांनी या स्टॉलला भेटी देवून क्रीडा प्रकार, क्रीडा साहित्यांची माहिती घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लातूरचे क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे यांनी केले, रेणापूरचे क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

लातूर जिल्हा आर्चरी असोसिएशन, लातूर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन, लातूर जिल्हा बॅडमिटन असोसिएशन, लातूर जिल्हा बॉक्सीग असोसिएशन, लातूर जिल्हा सायकलिंग असोसिएशन, लातूर जिल्हा डॉजबॉल असोसिएशन, लातूर जिल्हा तलवारबाजी असोसिएशन, लातूर जिल्हा फुटबॉल असोसिएशनम, लातूर जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशन, लातूर जिल्हा कबड्डी असेासिएशन, लातूर जिल्हा खो-खो असोसिएशन, लातूर जिल्हा लॉनटेनिस असोसिएशन, लातूर जिल्हा मल्लखांब असोसिएशन, लातूर जिल्हा रोलबॉल असोसिएशन, लातूर जिल्हा रोलर स्केटिंग/रोलर हॉकी असेासिएशन, लातूर जिल्हा सिकई मार्शल आर्ट असोसिएशन, लातूर जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन, लातूर जिल्हा स्क्वश असोसिएशन, लातूर जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन, लातूर जिल्हा व्हॉलीबॉल असेासिएशन, लातूर जिल्हा योगासन असोसिएशन, लातूर जिल्हा रग्बी असोसिएशन, लातूर जिल्हा आट्यापाट्याअसेासिएशन यांचे स्टॉल याठिकाणी लावण्यात आले होते.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु