आपले गाव, शहराच्या स्वच्छतेसाठी सर्वांनी ‘स्वच्छतेसाठी एक तारीख- एक तास’ उपक्रमात सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे

 

1 ऑक्टोबरला ‘स्वच्छतेसाठी एक तारीख- एक तास’ उपक्रम

आपले गाव, शहराच्या स्वच्छतेसाठी सर्वांनी ‘स्वच्छतेसाठी एक तारीख- एक तास’ उपक्रमात सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे

•       शहरी व ग्रामीण भागात स्वच्छता उपक्रमांचे आयोजन

       सर्व शासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था होणार सहभागी

       अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांचा होणार गौरव

 


लातूर, दि. 26 (जिमाका):
स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा अंतर्गत 1 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्ह्यात ‘स्वच्छतेसाठी एक तारीख-एक तास’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. आपण राहत असलेल्या परिसराची, आपल्या गावाची, शहराची स्वच्छता करण्यासाठी या मोहिमेत सर्वांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होवून ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे केले.

 ‘स्वच्छतेसाठी एक तारीख-एक तास' उपक्रमाविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, नगरपालिका प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त रामदास कोकरे, लातूर शहर महानगपालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशी 1 ऑक्टोबरला स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये स्वच्छता व सफाई या बाबींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती क्षेत्र, ग्रामीण भागातील बसस्थानके, पर्यटन स्थळे, वारसास्थळे, नदी किनारे, नाले आदी ठिकाणी अभियानांतर्गत स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे. यामध्ये नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने श्रमदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले.

सिंगल युज प्लास्टीकचा वापर व दुष्परिणाम याविषयी अभियान काळात जनजागृती केली जाईल, शालेय स्तरावरही स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासारखे विविध उपक्रम अभियान काळात राबविणेत येणार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या उपक्रमांमध्ये सहभागी होवून आपल्या गणेशोत्सव मंडळ परिसरातील स्वच्छता करावी. या उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन गणेशोत्सव मंडळांचा गौरव करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

**

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा